बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य! म्हणाले, "घाव सहन करणारे..." - Indurikar Maharaj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य! म्हणाले, "घाव सहन करणारे..."

Indurikar Maharaj : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर सोमवारी (६ फेब्रुवारी) बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याबाबत काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. आज त्यांनी थेट राजीनामा दिला त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस देखील आहे.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किर्तन सोहळ्यात इंदुरीकर महाराज यांनी सुचक वक्तव्य केले आहे. इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. इंदुरीकर महाराज म्हणाले, "कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे."

"जे दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात, हे वाक्य बाळासाहेब थोरात यांना लागू होतं. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा १०० वा वाढदिवसही आपल्याकडून व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी", असे इंदुरीकर महाराज म्हणाले. 

बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये नाराज-

बाळासाहेब थोरात यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना नाना पटोले यांच्यासोबत काम करता येणार नसल्याचे पत्रात सांगितले. नुकत्याच झालेल्या नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत राजकारणामुळे आपण त्रस्त असल्याचे ते म्हणाले. सत्यजित तांबे यांनी नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर त्यांच्या कुटुंबाची आणि थोरात यांची बदनामी करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.

"नाना पटोले माझ्यावर नाराज आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही. नाशिकमधील महत्त्वाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाला आणि गैरसमजाला एकटे पटोले जबाबदार आहेत," असे देखील थोरात यांनी म्हटल्याची चर्चा आहे.