चहापेक्षा किटली गरम ! शहरातील उद्योगांना मिळाली सशर्त परवानगी; पण उद्योजक म्हणतात... 

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 15 July 2020

सोलापुरात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन लागू झाला व प्रशासनाने उद्योग सुरू ठेवू इच्छिणाऱ्या उद्योजकांवर कामगारांची ने-आण करण्याची जबाबदारी टाकली. किंवा कामगारांना उद्योगाच्या स्थळीच राहण्याची व्यवस्था करण्याची अट घातली आहे. मात्र लघु उद्योगामध्ये मोडणाऱ्या यंत्रमाग व गारमेंट युनिटमध्ये 10 ते 15 कामगार संख्या असल्यामुळे व सध्या उत्पादनेच कमी असल्याने हा अतिरिक्त खर्च परवडत नाही. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करण्यापेक्षा उद्योग दहा दिवसांसाठी बंद करणे फायद्याचे ठरेल, या विचाराने उद्योजकांनी स्वत:हून लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोलापूर : शहरात प्रशासनाने 16 ते 26 जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यात सर्व उद्योग सुरू राहणार, मात्र कामगारांना ने-आण करण्याची किंवा त्यांना उद्योगाच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करावी लागेल, अशी अट घातली आहे. गेल्या वेळी लॉकडाउनमध्येही कामगारांना लॉक इन करून उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी विविध प्रशासकीय विभागांच्या परवानग्या घेणे, कामगारांना लॉक इन करणे या सर्वांसाठी उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याचा अनुभव पाहून, प्रशासनाने उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देऊनही उद्योजक म्हणतात, आम्ही दहा दिवस लॉकडाउन पाळू, मात्र उद्योग सुरू करणार नाही; कारण चहापेक्षा किटली गरम असल्याचा अनुभव आम्हाला मागील वेळी आला होता. 

हेही वाचा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! सोलापूर जिल्ह्यातील 31 गावांत "अशी' असेल कडक संचारबंदी 

शहरात मुख्यत: यंत्रमाग, विडी व गारमेंट उद्योगावर शहरातील कामगार अवलंबून आहेत. यंत्रमाग उद्योगात 40 हजार, विडी उद्योगात 55 ते 60 हजार व गारमेंट उद्योगात 15 ते 20 हजार कामगार कार्यरत आहेत. 22 मार्चपासून अडीच महिने लॉकडाउनची झळ या कामगारांसह उद्योजकांना बसली होती. उद्योग सुरू करण्यासंदर्भात प्रशासनास अनेकवेळा विनंत्या करण्यात आल्या. कामगार संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. शेवटी जून महिन्यात लॉकडाउन शिथिल होऊन सर्व उद्योग टप्प्या-टप्प्याने सुरू झाले. मात्र, उत्पादनांना मागणी नसल्यामुळे यंत्रमाग उद्योगात 40 ते 50 टक्के तर गारमेंट उद्योगात महत्त्वाचे युनिफॉर्म उत्पादन बंद असल्याने मास्क, पीपीई किट व हॅंडग्लोव्ह्‌ज अशी किरकोळ कामे सुरू आहेत. असे असताना पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन लागू झाला व प्रशासनाने उद्योग सुरू ठेवू इच्छिणाऱ्या उद्योजकांवर कामगारांची ने-आण करण्याची जबाबदारी टाकली. किंवा कामगारांना उद्योगाच्या स्थळीच राहण्याची व्यवस्था करण्याची अट घातली आहे. मात्र लघु उद्योगामध्ये मोडणाऱ्या यंत्रमाग व गारमेंट युनिटमध्ये 10 ते 15 कामगार संख्या असल्यामुळे व सध्या उत्पादनेच कमी असल्याने हा अतिरिक्त खर्च परवडत नाही. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करण्यापेक्षा उद्योग दहा दिवसांसाठी बंद ठेवणे फायद्याचे ठरेल, या विचाराने उद्योजकांनी स्वत:हून लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा : अबब..! नागाची तब्बल 22 पिल्ले एकाच ठिकाणी सापडली; कोठे? वाचा... 

अतिरिक्त खर्च परवडणारा नाही, त्यापेक्षा उद्योग बंद ठेवणार 
याबाबत सोलापूर गारमेंट असोसिएशनचे संचालक अमित जैन म्हणाले, कामगारांची ने-आण करणे किंवा त्यांना लॉक इन करून उत्पादने घेण्याएवढ्या मोठ्या गारमेंट फॅक्‍टऱ्या शहरात नाहीत. एकतर कामे नाहीत, किरकोळ कामे करून कसेतरी कामगारांना रोजगार देत आहोत. त्यात प्रशासनाने घालून दिलेल्या अटीनुसार उद्योग सुरू ठेवणे परवडणारे नाही. त्यात पुन्हा कामगारांसाठी ओळखपत्रे घेणे व इतर परवान्यांसाठी तीन-चार दिवस जाणार आहेत. त्यामुळे गारमेंट उद्योग दहा दिवस बंदच राहणार आहे. 

जे कारखानदार प्रशासनाचे नियम पाळू शकतात ते कारखाने चालू ठेवतील 
जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणाले, येथील 70 ते 80 टक्के यंत्रमाग कारखाने छोट्या स्वरूपाचे आहेत. ज्यांच्याकडे ऑर्डर असतील, कामगारांना ने-आण करू शकतील किंवा कारखान्यातच लॉक इन पद्धत अवलंबू शकतील ते प्रशासनाच्या नियमानुसार कारखाने सुरू ठेवतील. मात्र ज्यांच्याकडे काम कमी आहे ते कारखानदार बंद ठेवतील. 

स्वत:हूनच उद्योग सुरू करण्याबाबत मागणी केली नाही 
सोलापूर विडी उद्योग संघाचे सचिव सुनील क्षत्रिय म्हणाले, विडी उद्योगात हजारो महिला ब्रॅंचमध्ये विड्या देण्यासाठी लांबहून चालत येतात. पोलिसांना प्रत्येक कामगाराची आयडेंटिफिकेशन करताना गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कामगारांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व कारखानदार स्वत:हून लॉकडाउन पाळून विडी उद्योग बंद ठेवणार आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The industries in the Solapur city got conditional permission but the entrepreneurs will follow the lockdown