तरूणांसाठी प्रेरणादायी! अरणच्या ZP शाळेत शिकलेले अतुलचंद्र कुलकर्णी ‘NIA’चे विशेष पोलिस महासंचालक; ATS, IB, CIDमध्येही उत्कृष्ट कामगिरी

अरणसारख्या (ता. माढा) खेड्यातील ZP शाळेत शिकलेला मुलगा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) विशेष पोलिस महासंचालक होतो, ही सोलापूर जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी नुकताच पदभार घेतला आणि त्यांनी केलेल्या कामाचा आलेखच डोळ्यासमोरुन तरळून गेला.
ips atulchandra kulkarni
ips atulchandra kulkarnisakal

सोलापूर : अरण व टेंभूर्णीसारख्या (ता. माढा) अगदी खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) विशेष पोलिस महासंचालक होतो, ही सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब आहे. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी नुकताच पदभार घेतल्यानंतर त्यांनी पोलिस खात्यात केलेल्या कामाचा आलेखच डोळ्यासमोरुन तरळून गेला. दहशतवाद विरोधी पथकात असताना राज्यातील १२८ तरुणांचे मनपरिवर्तन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश व सीआयडीचे प्रमुख असताना पालघर येथील साधूवर झालेल्या हल्ल्याचा तातडीने लावलेला तपास या मोठ्या उपलब्धीच म्हणाव्या लागतील.

१२८ तरुणांचे मनपरिवर्तन

दहशतवाद विरोधी पथकाचा (एटीएस) प्रमुख म्हणून श्री. कुलकर्णी यांनी तीन वर्षे काम केले. या कालावधीत दहशतवादावरील उपाययोजनांची आखणी केली. फक्त कारवाई करणे हे टार्गेट न ठेवता दहशतवादी विचारांच्या सानिध्यात गेलेल्या तरुणांचे मनपरिवर्तन करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. यात अनेक उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग होता. १२८ तरुण-तरुणींना दहशतवादी कारवायांच्या प्रवाहात जाण्यापासून रोखण्यात त्यांना मोठे यश आले. धर्मगुरुंच्या मदतीने त्यांनी हे काम करताना त्या तरुणांशी मैत्री पूर्ण नाते निर्माण केल्यानेच त्यांना यश आले.

समुपदेशन मॉडेल देशभरात

दहशतवादी विचारांपासून दूर आणून अनेक तरुणांना केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामीण विकास योजनेतून प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी बॅंकेच्या माध्यमातून त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिले. यातील एक तरुण परगावात इंजिनिअरिंगला होता. वडील टेलरिंग काम करून घर सांभाळत. तो या रॅकेटमध्ये अडकला होता. त्याचे मन परिवर्तन करून मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय योजनेतून रोजगार मिळवून दिला.

दहशतवादापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने समुपदेशनासाठी बनवलेले डीरॅडिकलायझेशनचे मॉडेल काश्मीरसह देशातील अन्य राज्यांत उपयोगात आणण्यात येत आहे. बंद खोलीत बसून संगणकाच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले जात आहे. धर्माच्या नावाने प्रवृत्त केले जात आहे. दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत असताना सायबर दहशतवादाच्या अनुषंगानेही पोलिस दक्ष आहेत. सरकारने यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला आहे. राज्यापुरते असलेले तेव्हाचे काम आता राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी त्यांचा अनुभव कामास येईल.

श्री. कुलकर्णी यांची आजवरील कारकिर्द

अभियांत्रिकी पदवीधर असलेले श्री. कुलकर्णी मूळचे अरण (ता. माढा) येथील... १९९० मध्ये ते थेट आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) झालेले... त्यांनी नांदेड, जालना, जळगाव, बुलढाणा, मुंबई, भंडारा, नागपूर येथे विविध पदांवर काम केले. पोलिस अधीक्षक असताना सामान्य पोलिसांच्या कुटुंबांच्या कल्याणाचा विचार करणारा सहृदयी अधिकारी अशी त्यांची ओळख. नंतर त्यांनी केंद्रीय गुप्तचर विभागात (आयबी) तब्बल अकरा वर्षे काम केले. दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) असताना प्रवाहाबाहेर जाणाऱ्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्याची कसोटी, सीआयडीचे प्रमुख असताना पालघर येथे साधूवर झालेल्या समूह हल्याचा तपास केल्याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाची आज पुन्हा आठवण येते.

तुरुंग विभागाचे प्रमुख म्हणून कैद्यांच्या पुनर्वसनाच्या केलेल्या कामाची दखल घ्यावीच लागेल. खात्यात चांगली प्रतिमा असलेल्यांची खूपच वानवा असते... पण अतुलचंद्र कुलकर्णींबद्दल प्रत्येकजण आदरयुक्त भाषेतच बोलतो हे विशेष! आयबीमध्ये असताना कुलकर्णी यांना मूळचे सोलापूरचे मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली.

निवृत्तीनंतर श्री. पडसलगीकर केंद्रात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोभाल यांच्यासोबत काम करत आहेत. या दोन्ही सोलापूरकरांचा अभिमान वाटतो. अजून एका तिसऱ्या सोलापूरकरांचा उल्लेख करायचा राहिला... मूळच्या सोलापुरातील तामिळनाडू केडरच्या आयपीएस विद्या कुलकर्णी यांची सीबीआयच्या संयुक्त संचालकपदी कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com