मराठी शाळांत आता इंटरॅक्‍टिव्ह लर्निंग संकल्पना

मराठी शाळांत आता इंटरॅक्‍टिव्ह लर्निंग संकल्पना

बारामती - खडू व फळ्यापुरताच संबंध असलेली शाळा अलीकडे डिजिटल बनली. लोकसहभाग वाढला. मात्र, तरीही फक्त पाहून धडा शिकायचा, की प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन करायचे, हा प्रश्‍न सतावत होता. जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी आज तो सोडविला. त्यांनी दीड वर्षापूर्वी हाती घेतलेला शाळा स्मार्ट व डिजिटल करण्याचा प्रवास त्यापुढच्या टप्प्यावर म्हणजे राज्यातील पहिल्या इंटरॅक्‍टिव्ह डिजिटल स्कूलपर्यंत पोचविला. आता त्यांच्या माध्यमातून बारामतीसह तीन तालुक्‍यांतील ७५ शाळांमध्ये दररोज ‘इंटरॅक्‍टिव्ह लर्निंग’ ही नवी संकल्पना शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवे घट्ट नाते निर्माण करेल.

शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात रोहित पवार यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. ३०) राज्यातील पहिलाच प्रकल्प असलेला इंटरॅक्‍टिव्ह किऑस्क डिव्हाईस शाळांना वितरित केला. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी तावरे, भरत खैरे, रोहिणी तावरे, अभिजित तांबिले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे उपस्थित होते. या वेळी शिक्षणतज्ज्ञ संदीप गुंड यांनी तयार केलेल्या या यंत्रणेचे सादरीकरण केले व त्याचे अनावरणही विवेक वळसे पाटील व सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात वडगाव निंबाळकर, खांडज, सोनवडी सुपे, माळेगाव खुर्द या बारामती तालुक्‍यातील तर पुरंदर तालुक्‍यातील पोखर येथील शाळेस प्रातिनिधिक स्वरूपात हे इंटरॅक्‍टिव्ह किऑस्क डिव्हाईस भेट देण्यात आले. या कार्यक्रमानंतर उर्वरित ७० शाळांनाही संच देण्यात आले.    

...अशी आहे योजना
या योजनेसाठी २० टक्के लोकसहभागाची अट घालण्यात आली होती. उर्वरित खर्च मगरपट्टा सिटी कार्पोरेशन, बारामती ॲग्रो या कंपन्यांनी उचलला आहे. सध्याच्या डिजिटल स्कूलमध्ये ई-लर्निंग संचामध्ये बाजारात मिळणाऱ्या अभ्यासक्रमाच्या पेनड्राइव्ह किंवा मेमरीद्वारे धडे शिकविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांची दृकश्राव्य माध्यमातून बौद्धिक आकलनक्षमता वाढवली जात होती. आता यापुढचा टप्पा म्हणजे एकाच टीव्हीत अँड्रॉईड तंत्रज्ञानासह अगदी फळा, चित्रकलेपासून ते स्वतःच्या अध्यापनाचे व्हिडिओ तयार करण्यापर्यंत अनेक सॉफ्टवेअर्स समाविष्ट आहेत. त्यामध्ये शाळेतील शिक्षकच नव्हे तर मुलेही स्वतः शिकू शकतात. त्यांना हवे ते नवे बनवूही शकतात. नवनिर्मिती करण्यासाठी ही यंत्रणा अधिकच उपयुक्त असून त्यातून मुलांची बौद्धिक क्षमता वाढणार आहे. 

मागील वर्षी ४० शाळांमध्ये ई-लर्निंग संच दिले. मात्र, आताचे तंत्र खूपच आधुनिक व काळाचा विचार करणारे आहे. या माध्यमातून मुले अधिक बौद्धिक प्रगती साधू शकतील असे संच खासगी शाळांमध्येही नसल्याने खासगी शाळांपेक्षा मराठी शाळा अधिक चांगल्या होतील याकडे लोकसहभागातून आपण सर्वजण लक्ष देऊ. 
- रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com