फुले कृषी विद्यापीठासाठी तीसजणांच्या मुलाखती पण "बाहेर"चेच होणार कुलगुरू

रहिमान शेख
Thursday, 4 February 2021

कुलगुरुपदासाठी राज्यपाल पुन्हा मुलाखती घेतात, की थेट नाव घोषित करतात, याकडे आता राज्यातील कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी पात्र 30 उमेदवारांच्या मुलाखती 29 व 30 जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने झाल्या. समितीने पात्र पाच जणांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे दिल्याचे समजले.

कुलगुरुपदासाठी राज्यपाल पुन्हा मुलाखती घेतात, की थेट नाव घोषित करतात, याकडे आता राज्यातील कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसंदर्भात तीन जणांची समिती नेमण्यात आली होती. हवामान शास्त्रज्ञ लक्ष्मण राठोड, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे ए. के. सिंग, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांचा त्यांत समावेश होता. 

विद्यापीठाचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. किरण कोकाटे, डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या स्पर्धेत पाच वर्षांपूर्वी बंगळुरूच्या डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या गळ्यात कुलगुरुपदाची माळ पडली होती. त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठ मागे गेलेले दिसून आले. 

हेही वाचा - सरकार पवारांचेच, त्यांना कोण अडवेल

आता मात्र राज्याच्या कृषी क्षेत्रात सर्वांगीण विकासासाठी बाहेरील कुलगुरू परवडणारे नाहीत, असे चित्र आहे. या पदासाठी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मुलाखती दिल्या आहेत. 

याही वेळी परकेच? 
अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या निवडप्रक्रियेत अंतिम पाच उमेदवारांमध्ये विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना संधी मिळाली नसल्याची कुजबूज विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. याही वेळी बाहेरचेच कुलगुरू मिळणार, अशी शक्‍यता यामुळे निर्माण झाली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews of five candidates for the post of Vice Chancellor of Mahatma Phule University