बोजा असलेल्या प्रॉपर्टीची खरेदी-विक्री होते का? मालमत्ता विकणाऱ्याला होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा; त्या मालमत्तेचा लिलाव करुन बॅंक वसूल करू शकते कर्जाची रक्कम

बोजा पोकळ आहे की सध्याचा आहे, हे पडताळणीचे अधिकार दुय्यम निबंधकांना नसल्याचा गैरफायदा घेऊन अनेकजण तो बोजा पोकळ असल्याचे भासवून मालमत्तेची विक्री करतात. मात्र, त्या व्यक्तीला न्यायालयातून फसवणुकीच्या कलमाअंतर्गत सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
Demand for Land Sale
sakal Demand for Land Sale
Updated on

सोलापूर : जमीन-जागा मॉर्टगेज देऊन अनेकजण बॅंकांकडून लाखोंचे कर्ज घेतात. सातबारा उताऱ्यावर बोजा नोंद असतानाही पुढे ती मालमत्ता बॅंकेच्या परस्परच विकली जाते. अशावेळी बॅंक संबंधित कर्जदाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करते. बोजा पोकळ आहे की सध्याचा आहे, हे पडताळणीचे अधिकार दुय्यम निबंधकांना नसल्याचा गैरफायदा घेऊन अनेकजण तो बोजा पोकळ असल्याचे भासवून मालमत्तेची विक्री करतात. मात्र, त्या व्यक्तीला न्यायालयातून फसवणुकीच्या कलमाअंतर्गत सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

बनावट साक्षीदार, मालमत्तेचा मालक उभा करून अनेकांची मालमत्ता परस्परच दुसऱ्याला विकली जाते, अशीही काही उदाहरणे असून त्याप्रकरणी पोलिसांत देखील गुन्हे दाखल आहेत. पण, मालमत्तेवर बॅंकांचा बोजा असताना देखील अनेकजण बॅंकेचे कर्ज न फेडता मालमत्ता दुसऱ्याला विकतात. वास्तविक, तो बॅंकेचा बोजा परतफेड करूनच मालमत्ता विकणे अपेक्षित आहे. ज्या प्रॉपर्टीवर बॅंकेचा बोजा आहे, त्यावरील बॅंकेचा हक्क कायम राहतो.

भविष्यात प्रॉपर्टी कोणाकडेही गेली, तरी बॅंक त्या मालमत्तेचा लिलाव काढून कर्जाची रक्कम वसूल करू शकते, असे विधीतज्ज्ञ सांगतात. तत्पूर्वी, प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढून मालमत्तेची खरेदी केल्यास कायद्याच्या कचाट्यात खरेदी घेणारा अडकत नाही, असाही सल्ला त्यांनी दिला. तर दुय्यम निबंधक म्हणतात, प्रॉपर्टी मालकाने बॅंकेचा बोजा भरून ‘एनओसी’ जोडून मालमत्ता विकावी किंवा प्रॉपर्टी घेणाऱ्याची बोजासह खरेदीसाठी सहमती असेल तर तसे खरेदीदस्तात नोंद करावी.

बॅंकेकडे तारण जमिनीची परस्पर विक्री केल्याने गुन्हा

अकलूज येथील भारतीय स्टेट बॅंकेकडे तारण ठेवलेली जमीन परस्पर विकून बॅंकेची २२ लाख ६३ हजार २९३ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद बॅंकेचे अधिकारी रविकिरण सुधाकर शिंदे यांनी पोलिसांत दिली. त्यावरून गोपाळ भिकू सिद, शेखाबाई गोपाळ सिद व तानाजी गोपाळ सिद (तिघेही रा. पानीव, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या फिर्यादीत हनुमंत विश्वनाथ गमे (रा. माळखांबी) व गणपत मुरलीधर पाटील (रा. जांबूड) यांनीही बॅंकेकडे त्यांची जमीन तारण ठेवून पावणेबारा लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनीही बॅंकेच्या परस्पर जमीन विकून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूर शहरातही असा एक गुन्हा दाखल झाला आहे.

खरेदी झाली, तरी बॅंकेचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर राहतोच

सातबारा उताऱ्यावर बोजा असताना त्या प्रॉपर्टीची विक्री केल्यास मालक दोषी ठरतो. ‘बीएनएस’नुसार फसवणुकीच्या कलमांतर्गत त्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. दुसरीकडे बोजा असतानाही प्रॉपर्टी घेणाऱ्याच्या त्या मालमत्तेवरील बॅंकेचा अधिकार तसाच शाबूत राहतो. वेळप्रसंगी बॅंक त्या मालमत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करू शकते.

- ॲड. मनोज पामूल, सोलापूर

खरेदी देणारा व घेणाऱ्याने कागदपत्रांची पडताळूनच खरेदीदस्त करावा

ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार मालमत्ता लिहून देणाऱ्याने कागदपत्रे खरी द्यावीत. मालमत्ता खरेदी करणाऱ्याने (लिहून घेणारा) कागदपत्रे खरी असल्याची खात्री करावी. सातबारा उताऱ्यावर बॅंकेचा बोजा असेल, तर त्याची एनओसी खरेदीखतासोबत जोडावी किंवा खरेदी घेणाऱ्याने त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढल्यास फसवणूक होणार नाही.

- प्रकाश खोमणे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com