मुंबई, प्रयागराज इसिसचे ‘टार्गेट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, असे एटीएसतर्फे सांगण्यात आले.

मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, असे एटीएसतर्फे सांगण्यात आले.

पोलिसांनी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या या तरुणांपैकी अनेक जण उच्चशिक्षित असून, मोहसीन खान, सलमान खान आणि ताकी खान हे तिघे भाऊ मुख्य सूत्रधार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या तरुणांनी मुंबईसह अन्य अतिसंवेदनशील ठिकाणी रासायनिक हल्ला करण्याचा कट आखला होता; तसेच प्रयागराज येथील कुंभमेळ्यालाही लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता, असा पोलिसांचा संशय आहे. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत. या काळात पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याची धमकी इसिसने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर एटीएसने ही कारवाई केली . 

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसच्या प्रभावाखाली असलेले मोहसीन, सलमान आणि ताकी हे इतर तरुणांचा दहशतवादी कारवायांसाठी चिथावणी देत होते. सर्वांत मोठा मोहसीन हा मुंब्य्रातील अन्य सदस्यांवर देखरेख ठेवत होता. मोहंमद मजहर शेख हा भिवंडीतील एका कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करायचा. गेल्या वर्षी मुंब्य्रातील एका मशिदीत रमजानदरम्यान मोहंमदची मोहसीन आणि सलमान यांच्यासोबत भेट झाली होती. मोहसीन तीन दिवसांपूर्वी औरंगाबादला गेला होता. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मोहंमदला मुंब्य्रातून ताब्यात घेतले तेव्हा मोहसीन औरंगाबादला जाण्यासाठी बसमध्ये होता.

सिव्हिल इंजिनिअर फहाद शाह हा रमजानदरम्यान मुंब्य्रातील एका मशिदीत सलमानच्या संपर्कात आला. त्यानंतर एकमेकांच्या संपर्कात असलेले हे दोघे अनेकदा औरंगाबादला गेले होते. फहादकडे सौदी अरेबियाचा व्हिसा आहे.

सलमानने फहादचा ‘ब्रेन वॉश’ केला असून, मुंब्य्रातून अटक केलेल्या अल्पवयीन मुलाने इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि सायबर सायन्समध्ये पदविका घेतली आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झमेनला रसायनांबाबत चांगली माहिती आहे. मोहसीनने त्याला रासायनिक हल्ला घडवून आणण्यासाठी आपल्या गटात सामील करून घेतले होते. सर्फराज हा सलमानला मशिदीतील तरुणांची माहिती देण्यासाठी मदत करत होता, अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.

मलबारीचा मुलगा अटकेत
मुंब्रा येथून अटक करण्यात आलेला मजहर हा कुख्यात गुन्हेगार रशीद मलबारी याचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. भाजप नेते वरुण गांधी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली मलबारी याला कर्नाटक पोलिसांनी चार वर्षांपूर्वी अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर फरारी झालेल्या मलबारीला गेल्या वर्षी अबुधाबी येथून अटक करण्यात आली होती. तो एकेकाळी दाऊद इब्राहिम याच्यासाठी काम करत होता.

इसिस म्होरक्‍यांच्या संपर्कात
इसिसच्या प्रभावाखाली असलेले हे तरुण इंटरनेटच्या माध्यमातून सीरियातील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी आपल्या गटाचे नाव उम्मत-ए-मोहंमदिया असे ठेवले होते. हे तरुण औरंगाबाद आणि मुंब्य्रात रसायनांचे परीक्षण करत होते.

Web Title: ISIS Target to Mumbai and Prayagraj ATS