'आयटी'तील नोकरी सोडून तो करतोय समाजसेवा!

 'आयटी'तील नोकरी सोडून तो करतोय समाजसेवा!
'आयटी'तील नोकरी सोडून तो करतोय समाजसेवा!

एखाद्या तरुणाला जेवढ्या आयुष्याबद्दल अपेक्षा असाव्यात सर्वसाधारण अपेक्षांसह तो दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून पुण्यात आला. पुरेशा प्रयत्नानंतर त्याला चांगली नोकरीही मिळाली. नोकरीत जमही बसला. त्याला कविता करायची आवड होती. छोट्या-मोठ्या ठिकाणी कविता प्रसिद्धही होत होत्या. मात्र मनात कुठेतरी ‘आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो‘ हा विचार करून त्याला ‘आपण काहीच का करत नाही?‘ असा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. तशातच एक-दोन महिन्यांनी तो आई-वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे जात होता. भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील बहुतेक भागात बारा महिने अठरा काळ बाया-पोरांना डोक्‍यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असंच एक भयाण दृश्‍य त्याच्या संवेदनशील मनावर खोल परिणाम करून गेलं. त्याच काळात भीषण दुष्काळामुळे गावातील काही शेतकरी आत्महत्या करत होते. काही कुटुंबे घर-दार, जनावरे सारं काही सोडून काम शोधण्यासाठी गाव सोडतानाही त्याला दिसली. ती कुटुंबे जिथे जाणार होती तिथे कदाचित त्यांना पोटाची खळगी भरेल एवढे उत्पन्न मिळणारही होतं. पण दारिद्य्राचा हा नकोसा वाटणारा वारसा शिक्षणाअभावी पुढील पिढीकडे जाणार होता. त्याने ठरवलं या लोकांच्या मुलांना शिकवायचं. मोठं करायचं. स्वत:च्या पायावर उभं करायचं आणि ते त्यानं केलंही...

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्‍यातील अशोक बाबाराव देशमाने. वय वर्षे 27. शिक्षण एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स. पुण्यात लठ्ठ पगाराची आयटीतील नोकरी. मात्र मनातील खदखद स्वस्थ बसू देत नव्हती. बाबा आमटेंचे साहित्य बालपणापासून वाचल्याने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. सुदैवाने पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाश आमटेंची भेट झाली. अखेर त्याने ठरवले आपण काहीतरी करायचे. काहीतरी ठरवलं की संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं, सारी सृष्टी मदतीला धावून येते.. त्याप्रमाणे त्याच्याही मदतीला त्याचा ‘भवताल‘ धावून आला. अखेर त्याने कामाची दिशाही ठरवली. आत्महत्याग्रस्त, स्थलांतरित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा, त्यांना ‘मोठं‘ करण्याचा खडतर मार्ग त्याने पत्करला. त्यासाठी ‘स्नेहबंध‘ नावाच्या संस्थेची नोंदणी केली. हे सारं करत असताना नोकरी सुरूच होती. मग शोध घेतला मराठवाड्यातील गरजवंत विद्यार्थ्यांचा. विद्यार्थीही मिळाले. आता जागेचा प्रश्‍न होता. भोसरीतील अनिल खोटे या सद्‌गृहस्थानं कोणतीही भाडे अगर अनामत रक्कम न घेता 1000 स्क्वेअर फुटाची बांधलेली प्रशस्त जागा वापरण्यास उपलब्ध करून दिली. शिवाय मित्रांची मदत सुरूच होती.

आता त्याचा मार्ग तयार झाला होता. मग त्याने याच कामात आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. घरीही तो निर्णय बोलून दाखवला. त्याच्या घरात धार्मिक वातावरण असल्याने, वडिल संतसाहित्याने प्रेरित असल्याने हा खडतर कठीण मार्ग त्यांनाही आवडला. अर्थात एवढा मोठा पसारा वाढवताना त्यांना थोडीशी चिंता होतीच मात्र सुपुत्रावर विश्‍वास दाखवत त्यांनीही तोच मार्ग पत्करला. भोसरीतील ‘स्नेहवन‘मध्ये त्याच्याकडे आता 9 ते 14 वयोगटातील 17 मुलांचे पालकत्व आहे. त्यामध्ये बीड, जालना, हिंगोली, औरंगाबाद, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातील मुलांचाही समावेश आहे. काही मुलांच्या कुटुंबाची तर एवढी बिकट अवस्था होती की त्यांच्या आई-वडिलांना ‘स्नेहवन‘मध्ये मुलाला सोडवायला येण्यासही प्रवास खर्चासाठीही पैसे नव्हते. अशावेळी अशोकने पोस्टाने पैसे पाठवून मुलांना ‘जवळ‘ केले. या मुलांना भोसरीतीलच शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे. आपला मुलगा चांगल्या माणसाच्या हाती लागला याचा आनंद त्या मुलांच्या पालकांना आहे.

अखेर काही महिन्यांपूर्वीच त्याने ‘आयटी‘तील लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. जेवढा पगार त्याला महिन्याला मिळत होता त्यापेक्षा अधिक खर्च त्याला सध्या महिन्याला येत आहे. तरीही आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत, त्यामुळे समाजही या मुलांसाठी काहीतरी करेल याच आशेवर त्याने एवढा सारा पसारा वाढवला आहे. त्याची आई सत्यभामा या दररोज एवढ्या साऱ्या मुलांचा चहा-दूध, नाष्टा, जेवण करतात. वडील मुलांना सांभाळतात. त्यांचा अभ्यास घेतात. अशोककडे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे काहीतरी कौशल्य आहे. कोणी गाणे छान गातो. कोणी उलटी कोलांटउडी मारतो. कोणी स्वयंपाक छान करतो. तर कोणी छान-छान चित्रे काढतो. प्रत्येकातील प्रतिभेला आणि कलेला जागृत ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात या मुलांनी टिकाव धरावा म्हणून तो सर्वांना संगणक प्रशिक्षण देतो. त्यासाठी समाजातीलच एका बांधवाने त्याला संगणक भेट दिले आहेत. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी आहे त्या जागेतच त्याने जमेल तेवढी पुस्तके जमवून ग्रंथालय तयार केले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्याही ठरलेली आहे. मुलेही अगदी आनंदाने राहतात. शिकतात. ‘आयुष्यात काहीही झाले तरी खोटे बोलायचे नाही‘ हा संदेश तो सर्वांच्या मनावर रुजविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सोबत राहत असल्याने कधी एखाद्याचे भांडण झाले तर संध्याकाळी ते प्रामाणिकपणे अशोककडे त्याची कबुली देऊन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. सर्व मुले ज्या शाळेत जातात तेथील शिक्षकांनाही या मुलांच्या हुशारीचे कौतुक वाटते. अशोक वडील बाबाराव यांनी मुलांना 30 पर्यंत पाढे शिकविले. त्याही पुढे जाऊन एका मुलाने तर 32 पर्यंतचे पाढे तयार केले आणि ते पाठही केले आहेत. ज्यावेळी ‘हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी‘, अशी प्रार्थना ज्यावेळी ‘स्नेहवन‘मधील विष्णू नावाचा बारा वर्षांचा मुलगा म्हणतो त्यावेळी संवेदनशील व्यक्तीच्या हृदयात कालवाकलव झाल्याशिवाय राहत नाही.

या सर्व विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च 50-60 हजार रुपये असल्याने अशोकला मदतीसाठी सतत धावाधाव करावी लागते. सोबत आई-वडील मुलांकडे लक्ष देतात. अशा परिस्थितीत ज्यावेळी तो 50 हजार रुपये मिळवितो त्यावेळी फक्त पुढील एका महिन्याची सोय झालेली असते. त्यामुळे अशोकला सतत आर्थिक चिंता सतावत असते. एकप्रकारे समोर अंधार दिसत असताना अशोक मनातील आशेचा प्रदीप घेऊन पुढे जात आहे. त्याला गरज आहे समाजाच्या मदतीची.

‘यापैकी काही मुले आर्थिकदृष्ट्या एवढी दुर्बल होती की, त्यांच्या पालकांना येथे आणून सोडणेही शक्‍य नव्हते. त्यावेळी आम्ही त्यांना पोस्टाने पैसे पाठवून बोलावून घेतले. आता ही मुले येथे आनंदाने राहतात. खेळतात. शिकतात. ती मोठी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.‘
- बाबाराव देशमाने, अशोकचे वडील

‘सतरा मुलांचे पालकत्व स्वीकारल्याने यावर्षी गणेशोत्सादरम्यान येणाऱ्या महालक्ष्मीचीही (गौरी) स्थापना करता आली नाही. मात्र, लहान-लहान, निराधार, निरागस मुलांना सांभाळल्याने आम्हाला त्याची खंत महालक्ष्मी न केल्याची खंत वाटत नाही. शेवटी ‘मनुष्यसेवा हीच ईश्‍वरसेवा‘ यावर आम्हा सर्वांचा विश्‍वास आहे.‘
- सत्यभामा देशमाने, अशोकची आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com