Jalna Lathicharge : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; फडणवीसांपासून मंत्री दानवेंपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये - देवेंद्र फडणवीस
Jalna Maratha Andolan Political leaders
Jalna Maratha Andolan Political leadersesakal

Maratha Protest : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात शुक्रवारी (ता. एक) दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांकडून लाठीमार झाला. यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले.

Jalna Maratha Andolan Political leaders
पोलिसांनी मराठा आंदोलकांवर का केला लाठीचार्ज?, जालन्यात नेमकं काय घडलं?; संपूर्ण घटनाक्रम वाचा...

दरम्यान, या घटनेचे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद (Jalna Police Bandobast) उमटले, बसची जाळपोळ करण्यात आली. गोदाकाठ तणावपूर्ण शांतता पसरली होती. दरम्यान, अनेकांनी समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे. जालन्यात शनिवारी (ता. दोन) या घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको आणि बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेनंतर सामाजिक, राजकीय नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया देऊन संताप व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या (Jalna Maratha Reservation) मुद्द्यावर सरकार प्रयत्नशील आहे. असे असतानाही एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवून त्याच्या तब्येतीची चौकशीही न करणे हा गंभीर प्रकार आहे. त्या गावात पोलिसांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये. आरक्षणाची गरज नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते वेगळेच बोलत आहेत. हा विषय राजकारणाचा नाही.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Jalna Maratha Andolan Political leaders
Maratha Quota Protest : मराठा आंदोलनाचा भडका; बसची जाळपोळ, वाहनांची तोडफोड; पोलिसांकडूनही लाठीहल्ला

आरक्षणाची मागणी रास्त, न्याय्य आहे. पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना शिंदे-फडणवीसांच्या पोलिसांनी गुरा-ढोरासारखे झोडपले. पोलिसांनी लाठीमार कुणाच्या आदेशावरून केला. हेच का जनतेच्या हिताचे सरकार? सरकारच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही.

- संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)

Jalna Maratha Andolan Political leaders
धक्कादायक! डोक्याचे केस धरून फरफटत नेत दलित महिलेसह अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण; साताऱ्यातील घटनेने संताप

झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. मराठा समाजाची मागणी ही योग्य असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले होते. मात्र, पुढे ते न्यायालयात टिकले नाही. राज्य शासन मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील मराठा समाज बांधवांनी शांतता ठेवून आंदोलनाला हिंसक वळण लागणार याची दक्षता घ्यावी.

- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचे आंदोलन मोडून काढण्यात पोलिसांनी बळाचा, बेछूट लाठीचा वापर केला आहे. याचा मी निषेध करतो. शांततेने आंदोलन सुरू असताना ते दडपण्यासाठी केलेली ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली गेली याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे.

-अंबादास दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते

Jalna Maratha Andolan Political leaders
NCP Crisis : अजितदादा गटातून कोणी आपल्यात येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मागच्या बाकावर बसवा; शरद पवारांचे आदेश

आम्ही मनोज जरांगे यांच्या संपर्कात होतो. मी स्वत: त्यांच्याशी बोललो, मुख्यमंत्र्यांशीही त्यांचे बोलणे करुन दिले. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मनोजची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी घेऊन जाताना पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर लाठीचार्ज झाली. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरिक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे.

-अतुल सावे, पालकमंत्री

मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करतो. मराठा आरक्षण कसे देणार, हे सरकारने तातडीने स्पष्ट करावे नाहीतर असा उद्रेक होतच राहील. दुसरीकडे माझी मराठा समाज बांधवांना अशी विनंती आहे की आरक्षणाची मागणी आपण ज्या शांततामय आणि कायदेशीर मार्गाने लावून धरली आहे, ती नेटाने लावून धरुया.

-विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते

समाज बांधवांनी शांतता राखावी. कायदा हातात घेऊ नये. मराठा आरक्षण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू.

- राजेश टोपे, माजी राज्यमंत्री तथा आमदार, घनसावंगी

अंतरवाली सराटी येथील घटना ही दुर्दैवी आहे. आंदोलक आणि मुख्यमंत्री यांच्यात मी स्वतः संवाद घडविला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असून त्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे. या झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाई राज्य शासनाकडून केली जाईल. सर्व मराठा समाज बांधवांनी शांतता बाळगावी.

- अर्जुन खोतकर, माजी राज्यमंत्री, जालना

Jalna Maratha Andolan Political leaders
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' अध्यक्षांचा शौमिका महाडिकांवर पलटवार; 'महाडिकांनी फक्त राजकीय हेतूनंच तसं केलंय'

झालेली दुर्दैवी घटना ही निषेधार्थ आहे. पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला कोणाच्या सांगण्यावरून केला, या गोष्टीची चौकशी होणे गरजेचे आहे. आंदोलकांशी चर्चा करणे गरजेचे असताना पोलिसांकडून आंदोलकांना हुसकावून लावले. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. सरकारच्या याच कृतीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

- राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, जालना

झालेला प्रकार चुकीचा आहे. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा. तसेच एकनाथ शिंदे व अजित पवार गटाने सरकारमधून बाहेर पडावे. अन्यथा मराठा समाज यांना माफ करणार नाही. लाठीमार करण्याचे आदेश देणाऱ्या तहसीलदारांना निलंबित करावे.

- संजय लाखे पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

पोलिसांनी केलेला लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा घाट या सरकारने घातला की काय अशी शंका आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचे जे महत्त्व इतिहासात आहे. अगदी तसेच महत्त्व या घटनेचे राहील. सरकारने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. आता मराठा समाजाची ओबीसी आरक्षण मागणी करणारी चळवळ ज्वालामुखीत रूपांतर होईल.

- योगेश केदार, मराठा आंदोलक

Jalna Maratha Andolan Political leaders
Jalna Maratha Andolan : 'मराठा समाजाला डिवचाल तर हिशेब चुकता करू'; पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कोल्हापुरात पडसाद

संवादातून मार्ग काढणे गरजेचे होते. पोलिस आणि आंदोलकांनी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन करणार आहोत, त्यापूर्वी पोलिसांनी आम्हांला ही नोटिसा दिल्या आहेत. मात्र, एकंदरीत या घटनेच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणासाठी शनिवारी अंबड चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

- अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ.

आजचा प्रकाराचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासनाचा निषेध करत आहोत. या घटनेचे शासनाला येणाऱ्या काळात परिणाम भोगावे लागतील. मराठा समाजाच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागेल.

- अशोक पडूळ, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

पोलिसी बळाने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. याचे कारण म्हणजे जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या निषेधार्थ शनिवारी (ता.दोन) जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा बंदची हाक देत आहोत.

- जगन्नाथ काकडे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होते. ग्रामस्थांचा काही दोष नसताना अमानुष हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेचा विश्वास होता, तो विश्वास साफ खोटा निघाला.

- मनोज जरांगे, मुख्य उपोषणकर्ते, अंतरवाली सराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com