जावेद अख्तर यांचा पाकिस्तान दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. तशी माहिती जावेद अख्तर यांनी ट्‌विट करून दिली आहे.

मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. तशी माहिती जावेद अख्तर यांनी ट्‌विट करून दिली आहे.

दिवंगत कवी व जावेद अख्तर यांचे वडील कैफी आझमी यांच्या कवितांविषयी दोन दिवसांचे साहित्य महोत्सव कराचीत होणार आहे. त्यासाठी कराची आर्ट कौन्सिलकडून अख्तर व शबाना आझमी यांना निमंत्रण मिळाले होते. ते त्यांनी स्वीकारलेही होती; मात्र काल पुलवामा येथे "सीआरपीएफ'च्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कराचीतील हा कार्यक्रम 23 आणि 24 फेब्रुवारीला होणार आहे.

या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत जावेद अख्तर यांनी "सीआरपीएफ'संबंधीच्या आठवणीही ट्विटरवरून जागविल्या आहेत.

'सीआरपीएफ'शी माझे खास नाते आहे. मी त्यांच्यासाठी एक गीतही लिहिले आहे. ते लिहिण्यापूर्वी "सीआरपीएफ'च्या काही अधिकाऱ्यांना मी भेटलो. त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे या शूर जवानांविषयी माझा आदर आणि प्रेम द्विगुणित झाले,'' असे नमूद करीत पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. शबाना आझमी यांनीदेखील ट्‌विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे.

Web Title: javed akhtar and shabana azmi pakistan tour cancel