भाकड गाईंचाच भाजप-सेनेत प्रवेश - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

मुलाखत दिलेले प्रमुख नेते 

  • आमदार दत्तात्रेय भरणे (इंदापूर) 
  • माजी आमदार दिलीप मोहिते (खेड) 
  • माजी आमदार अशोक पवार (शिरूर) 
  • माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद (शिरूर) 
  • माजी आमदार रमेश थोरात (दौंड) 
  • जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे (भोर) 
  • बांधकाम सभापती प्रवीण माने (इंदापूर)

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमधील फक्त भाकड गाईच भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करीत आहेत, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

भाकड गाई पक्षाबाहेर गेल्याने, किमान आता नव्या दमाच्या तरुणांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संधी देऊ शकू, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पाटील शनिवारी पुण्यात आले होते, त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. दरम्यान, पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रवक्‍त्या विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या मुलाखती घेतल्या. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी बारामती व आंबेगावमधून प्रत्येकी एक जणच इच्छुक असल्याने, या दोन्ही मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी आज मुलाखती घेतल्या नाहीत, त्यामुळे बारामतीतून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आंबेगावमधून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. 

उर्वरित आठ विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त जुन्नरचा अपवाद वगळता अन्य सात मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्नरमधून केवळ तीन जण, तर अन्य सात मतदारसंघांतून किमान पाच आणि कमाल नऊ जण इच्छुक आहेत. 

भोर आणि मावळ या दोन मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक प्रत्येकी नऊ जण इच्छुक आहेत. मात्र, मावळमधील नऊ इच्छुकांपैकी चार जणांनी आजच्या मुलाखतीला दांडी मारली. खेड, शिरूर आणि दौंडमधील प्रत्येकी एका इच्छुकानेही मुलाखतीला गैरहजेरी लावली. जिल्ह्यातील दहा जागांसाठी ५७ जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. यापैकी बारामती व आंबेगाव वगळता उर्वरित आठ जागांसाठी ५५ जण इच्छुक 
आहेत.

विधानसभानिहाय इच्छुकांची संख्या 
  भोर व मावळ प्रत्येकी    ९
  खेड    ८
  इंदापूर व दौंड प्रत्येकी    ७
  शिरूर    ६
  पुरंदर    ५ 
  जुन्नर    ३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil Talking Politics