मराठा विद्यार्थ्यांच्या जातपडताळणीच्या अर्जाचे टोकन ग्राह्य धरा- जयंत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
- म्हणून, जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय धरण्यात यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय धरण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज (ता.26) विधानसभेत केली.

दैनिक सकाळने याबाबतचे वृत्त मंगळवार (ता.25)च्या अंकात नमूद करत सरकारी नियमांच्या नव्या आदेशाची अडकाठी होत असल्याचे मांडले होते. आज विरोधी पक्षाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत हे सरकारच्या निदर्शनास आणले. 

मराठा समाजातील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी एसीबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली की नाही हे पाहिले जाते. त्यात जातपडताळणी प्रमाणपत्र उशिरा मिळते. ज्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणी साठी अर्ज केले आहे त्यांनी टोकन घेतले आहे ते टोकन ग्राहय धरावे असेही जयंत पाटील म्हणाले.

मात्र विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत सर्व कागदपत्रे फॅसिलिटेशन सेंटरमध्ये पडताळणी करण्यासाठी जमा करावे असे सांगितले जात आहे ही बाब संबंधित मंत्र्यांच्या जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली. मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळण्यापासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा कालावधी देवून त्यांच्याकडून प्रमाणपत्र दाखल करुन घ्यावे असे आदेश द्यावेत अशी मागणीही पाटील यांनी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत स्पष्ट करताना या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तुर्तास जातपडताळणी प्रमाणपत्राचे बंधन प्रवेशासाठी राहणार नसल्याचे जाहिर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaynt patil demands in assambly accepte the caste Verification token of maratha caste student