esakal | शासकीय नोकरीच्या नावावर फेक लिंक व्हायरल, राज्यात हजारो बेरोजगारांसोबत ‘जॉब फ्रॉड’
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

शासकीय नोकरीच्या नावावर फेक लिंक व्हायरल, हजारो बेरोजगारांसोबत ‘जॉब फ्रॉड’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे राज्यभरातील अनेक उच्चशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. वेगवेगळ्या कंपन्या आणि शासकीय भरतीच्या नावाने सायबर गुन्हेगार (cyber crime) फेक लिंक व्हायरल करीत आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास ‘प्रोसेसिंग फी’च्या नावावर अनेक बेरोजगारांना गंडा (job fraud) घातला जात आहे. जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यांत १४६ जणांची नोकरीच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली असून गंडा घातला आहे.

हेही वाचा: लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

राज्यातील हजारो उच्चशिक्षित बेरोजगार नोकरी मिळण्यासाठी नानाविध वेबसाइटवर ऊठसूट फॉर्म भरत असतात. नोकरी देणाऱ्या वेबसाईट्सकडे हजारो उच्चशिक्षित युवकांचा पत्ता, नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि फोटोसह डाटा उपलब्ध असतो. हजारो युवकांचा डाटा कंपन्या थेट सायबर गुन्हेगारांना तगड्या किमतीत विकतात. कंपन्यांकडून मिळविलेल्या यादीला सायबर गुन्हेगार टार्गेट करतात. त्यांना नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवतात. तसेच ‘जॉब प्लेसमेंट’ किंवा ‘व्हॅकन्सी’ नावाने लिंक पाठवितात. तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आकर्षक अशी नोकरीची जाहिरात देतात. त्यावरील नंबरवर कॉल केल्यास मोठ्या कंपनीचे नाव घेऊन त्यात जॉब आहेत व आपण ‘बॅक डोअर’ नोकरी लाऊन देवू शकतो, असे सांगतात. शासकीय खात्याचा लोगो वापरून बोगस वेबसाइट तयार करण्यात येतात.

आशेपोटी भरतात फॉर्म -

आपल्याला नोकरी मिळेल या आशेने इच्छुक बेरोजगार फोन करतात किंवा फॉर्म भरतात. त्यानंतर लगेच तीन दिवसांत आपल्या बायोडाटातील शिक्षणानुसार जॉब ऑफर केला जातो. उमेदवाराला रजिस्ट्रेशन फी, प्रोसेसिंग फी, जॉईनींग फी अशा विविध शुल्काच्या नावाने पैसे भरण्यास सांगतात. जॉबच्या आशेने जाळ्यात अडकल्यानंतर पैसे तर जातातच आणि नोकरीपण मिळत नाही.

काय आहे जॉब फ्रॉड -

२०१७ नंतर शासनाने मेगा-भरतीचे स्वप्न दाखवित तरुणांना आशेवर ठेवले. मात्र, कोणतीही भरती काढली नाही. त्यानंतर कोरोनाचे महासंकट उभे राहिले. त्यामुळे नवीन नोकर भरती तर झालीच नाही उलट आहेत त्यांच्याच नोकऱ्या गेल्या. परंतु, याच काळात मोफत किंवा अतिशय स्वस्त फोर जी नेटवर्क आले. ऑनलाइन राहण्याच्या सवयीतून अनेक ऑनलाइन फ्रॉड निर्माण झाले. जॉब मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या युवकांना गंडा घालण्यात येत असल्यामुळे याला जॉब फ्रॉड म्हणून ओळखले जाते.

नोकरीसाठी सोशल मीडियावरून किंवा एखाद्या बोगस वेबसाइटवरून माहिती प्रसारित होत असते. परंतु, शासनाच्या किंवा संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जागा निघाल्या का, याची खात्री करून घ्या. नोकरी लावण्यासाठी कोणी पैसे भरण्यासाठी सांगितले तर अधिक सावध व्हा. नोकरी संबंधाने आपली फसवणूक झाल्यास संपूर्ण महितीसह जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करा.
- केशव वाघ, सायबर क्राईम, नागपूर पोलिस.
loading image
go to top