

solapur crime
sakal
सोलापूर : महापालिकेच्या प्रभाग ‘दोन-क’मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपने माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीवरून निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेब सरवदे या तरुणाचा खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या उमेदवार शालन शिंदेंसह पाच जणांना ताब्यात घेतले असून १० जण फरार आहेत. जेलरोड पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत तपास करीत आहेत. भाजपकडून बी-फॉर्म मिळाल्यानंतर शंकर शिंदे व शालन शिंदे यांनी विरोधातील रेखा दादासाहेब सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. यावेळी चुलत भाऊ दादासाहेब सरवदे यांची बाजू घेत बाळासाहेब सरवदे वादात उतरले. या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाले. घटनास्थळावरून तलवारी, कोयते, चाकू व काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
समाजातील प्रत्येकाला पाच वर्षांची संधी देण्याचे ठरले असतानाही शालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षाने त्यांनाच बी-फॉर्म दिला. त्यामुळे नाराज झालेल्या रेखा दादासाहेब सरवदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. विशेष म्हणजे सरवदे व शिंदे ही दोन्ही कुटुंबे जवळची नातेवाईक असून भाजपचे कार्यकर्तेच आहेत. उमेदवारीवरून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद तीन वेळा मिटवला होता; मात्र शुक्रवारी (ता. २) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शंकर शिंदे व बाळासाहेब सरवदे यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यात बाळासाहेबाचा खून झाला. मयत बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युवक पदाधिकारी होता. घटनेनंतर मार्कंडेय रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांचा आक्रोश आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली. भावाला न्याय मिळावा, अशी मागणी करताना बाजी सरवदे भावूक झाले होते.
बाळासाहेबाच्या मुलीचा गुरुवारी झाला होता वाढदिवस
बाळासाहेब सरवदे (रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) हा मनसे युवक संघटनेचा पदाधिकारी होता. त्याला दोन लहान मुली असून नववर्षाच्या सुरुवातीला, १ जानेवारी रोजी मोठ्या मुलीचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला होता. मात्र वडिलांनी साजरा केलेला तो वाढदिवस शेवटचा ठरला. ही आठवण काढत नातेवाईक रुग्णालयाबाहेर आक्रोश करीत होते.
जोशी गल्लीचा ढाण्या वाघ गेला…
जुना बोरामणी नाका परिसरातील जोशी गल्लीतील तरुणांच्या हाकेला ओ देणारा बाळासाहेब सरवदे सर्वांचा मित्र होता. बाळासाहेब सरवदे याची भाची शंकर शिंदे यांच्या घरात दिली आहे. शिंदे आणि सरवदे ही दोन्ही कुटुंबे जवळची असतानाही शंकर शिंदे यांच्या भाच्याने व इतरांनी बाळासाहेबाचा जीव घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटत होती. “मारायलाच नको होते; जखमी केले असते तरी चालले असते,” अशा शब्दांत नागरिक भावना व्यक्त करीत होते. चार दिवसांच्या राजकारणाने जोशी गल्लीच्या ‘ढाण्या वाघा’चा बळी घेतल्याची चर्चा तरुणांत होती.
‘बाजी’ला पाडले एकटे; बाळासाहेबावर मागून वार
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास शंकर शिंदे यांच्याघराजवळ थांबल्यावर त्याठिकाणी येऊन ‘आम्ही जिंकलो’ असे म्हणून अमर शंकर शिंदे व ईश्वर बाबू शिंदे ओरडत होते. त्याचा जाब विचारल्यावर त्यांनी तुम्हाला मस्ती आलीय म्हणून वाद सुरु केला. त्यावेळी संशयित आरोपी त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयता, चाकू, तलवारी, काठ्या होत्या. त्यांनी बाळासाहेबाला मारहाण सुरु केली. त्याचवेळी शारदा तानाजी शिंदे व शालन शंकर शिंदे या दोघींनी बाळासाहेबाच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यावेळी राहुल राजु सरवदे, सुनील शंकर सरवदे व तानाजी बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे यांनी त्याच्यावर वार केले. त्यात बाळासाहेब जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला, असे बाजीराव सरवदे यांच्या फिर्यादीत नमूद आहे. या खून प्रकरणात काहींनी बाजीला पकडून ठेवले आणि बाळासाहेबाचा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
१५ जणांवर गुन्हा, उमेदवारासह पाच जणांना रात्री उशिरा अटक
भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह अमर शिंदे (२८), आतिष शिंदे (२६), तानाजी शिंदे (४६) आणि राहुल सरवदे (३२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या भांडणात आतिषच्या डोळ्याजवळ तर राहुलच्या पोटावर जखम झाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अमर शंकर शिंदे, विशाल शंकर शिंदे, अतिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजु सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, तानाजी बाबू शिंदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे व विशाल संजय दोरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी रात्रभर जोशी गल्ली आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.