कंगना राणावत विरोधात काँग्रेसच्या नसीम खान यांनी केली पोलीस तक्रार | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arif Naseem Khan

कंगना राणावत विरोधात काँग्रेसच्या नसीम खान यांनी केली पोलीस तक्रार

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याबद्दल (Indian freedom) अनुचित वक्तव्य करणारी (controversial statement) अभिनेत्री कंगना रणावत (kangana ranaut) हिच्याविरोधात राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान (Arif Naseem Khan) यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात (Sakinaka Police) तक्रार नोंदविली (police complaint) आहे.

हेही वाचा: आकांक्षाला भर रस्त्यात संपवण्याचं कारण आलं समोर, मुंबईतील थरारक घटना

कंगना रणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी नसिम खान यांनी शुक्रवारी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर मध्य मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगदीश आमीन, मो. शरिफ खान, प्रभाकर जावकर, माया खोत आदी पदाधिकारीही उपस्थित होते. केंद्र सरकारने तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा तसेच तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशा मागण्याही खान यांनी केल्या आहेत.

भारताला 1947 मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नसून भीक आहे, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असे बेताल वक्तव्य करुन अभिनेत्री कंगना रणावत हिने लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगनाचे विधान हा देशद्रोहच आहे. त्यामुळे कंगना राणावतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही खान यांनी केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी मोठा संघर्षपूर्ण व प्रदिर्घ लढा द्यावा लागला आहे. ब्रिटिशांच्या जुलमी, अत्याचारी राजवटीला भारतातून हाकलून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, शहिद भगतसिंग यांच्यासारख्या अनेकांचे योगदान या स्वातंत्र्य लढ्यात होते.

ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ म्हणत शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या खाल्या, आपले प्राण दिले. या सर्वांच्या त्यागामुळे आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. परंतु अभिनेत्री कंगना रणावतसारख्या अविचारी व्यक्तीने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार देणे हा पुरस्काराचाही अपमानच आहे. त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पद्मश्री पुरस्कारही परत घ्यावा अशी मागणी खान यांनी केली आहे.

loading image
go to top