ST Bus Stand : स्वच्छ, सुंदर बस स्थानकांना मिळणार बक्षीस; एसटी महामंडळाची राज्यभर मोहीम

जे बस स्थानक स्वच्छ, सुंदर असेल त्या बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षीस दिली जाणार आहेत.
ST Bus Stand : स्वच्छ, सुंदर बस स्थानकांना मिळणार बक्षीस; एसटी महामंडळाची राज्यभर मोहीम
Summary

जे बस स्थानक स्वच्छ, सुंदर असेल त्या बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षीस दिली जाणार आहेत.

कऱ्हाड - खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बस स्थानक स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेतली आहे.

जे बस स्थानक स्वच्छ, सुंदर असेल त्या बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षीस दिली जाणार आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय ५० लाख, २५ लाख, तर १० लाखांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. प्रवाशांना बस स्थानक आपले वाटावे आणि जास्तीतजास्त प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करावा, यासाठी महामंडळाने या अभियानांतर्गत बस स्थानकांसाठी तब्बल दोन कोटींची बक्षिसे ठेवली आहेत.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने काळानुरूप बदलासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोनाचे महासंकट आले. त्यामध्ये एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. त्याची एसटीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. त्यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतुकीची सेवा सुरू केली. उपलब्ध बसपैकी काही बस मालवाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केली. त्यातून एसटी महामंडळाला आर्थिक उत्पन्न सुरू झाले. ती मालवाहतूक सेवा आजही सुरू आहे. दरम्यान एसटीने प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून आता सवलतीच्या पाससाठी स्मार्टकार्ड सुरू केली आहे.

त्याचबरोबर आता डिजिटल सेवेकडेही महामंडळ वळत आहे. यापुढे एटीएमवरून तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या बस या अजूनही ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दळणवळणाच्या मुख्य साधन आहेत. ग्रामीण भागात अजूनही अनेक गावांत वाट पाहीन; पण एसटीनेच जाईन अशी स्थिती आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत एसटी बसची संख्या नसल्याने एसटीलाही प्रवासी वाहतुकीसाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे फावते आहे.

दरम्यान मध्यंतरी शासनाने एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था देण्यासाठी आणि प्रवासी संख्या वाढण्यासाठी महिलांना अर्धे तिकीट करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या दुपटीने वाढली आहे. एवढ्या उपाययोजना करूनही एसटी महामंडळाच्या एसटीबस, एसटी बसस्थानके हे स्वच्छ नसतात. त्यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. शिंदे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना स्वच्छ-सुंदर बस स्थानक करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्याचा विचार करून एसटी महामंडळाने केवळ अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देऊन बस स्थानके स्वच्छ होणार नाहीत तर स्वच्छ, सुंदर बस स्थानकासाठी बक्षीस ठेऊन स्वच्छतेची मोहीम राबविण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ५८० बसस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी, तसेच एसटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्व बसस्थानकात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसहभागाचाही जोड देण्यात येणार आहे.

अशी असेल स्वच्छता मोहीम

राज्यातील सर्व बस स्थानकातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षण समिती नियुक्त केली आहे. त्या समितीमार्फत दर दोन महिन्याला परीक्षण करण्यात येणार आहे. त्यात बस स्थानक परिसर, स्वच्छतागृह, प्रवासी बसची स्वच्छता, सुशोभीकरण, टापटीपपणा यावर आधारित गुण दिले जातील. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, प्रवाशांसोबत सौजन्यशील वागणे, उत्पन्न वाढीसाठी केलेली प्रयत्न, बसचे वेळापत्रक याचाही गुण देताना विचार केला जाणार आहे.

अशी आहे स्पर्धेची वर्गवारी

स्वच्छ, सुंदर बस स्थानकांची स्पर्धा ही शहरी विभाग- अ वर्ग, निम शहरी विभाग- ब वर्ग, ग्रामीण विभाग-क वर्ग या तीन विभागातील बस स्थानकात घेण्यात येईल. ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर, अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागातही होणार आहे. त्यामध्ये शहरातील मुख्य बस स्थानक, तालुका बस स्थानक व ग्रामीण भागातील गावागावांतील बस स्थानकांची स्वच्छता व सुशोभीकरण याचा समावेश असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com