सहकारी बॅंकांनी समान सेवा उपलब्ध कराव्यात  - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

कऱ्हाड - जगातील नवीन तंत्रज्ञानाच्या बदलाचा परिणाम सहकार क्षेत्रातील बॅंकिंगवर होणार आहे. त्यादृष्टीने अभ्यास करून बॅंकांनी आयटी व्हीजन प्लॅन करताना बिझनेस व्हीजनही ठेवावे, त्यासाठी बॅंकांना डिजिटलायझेशन अनिवार्य आहे. त्याच्या तंत्रज्ञानासाठी होणारा मोठा खर्च सहकारातील सर्वच बॅंकांना परवडणारा नसल्याने सहकारी बॅंकांनी एकत्र येऊन समान सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विचार करावा,' असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड - जगातील नवीन तंत्रज्ञानाच्या बदलाचा परिणाम सहकार क्षेत्रातील बॅंकिंगवर होणार आहे. त्यादृष्टीने अभ्यास करून बॅंकांनी आयटी व्हीजन प्लॅन करताना बिझनेस व्हीजनही ठेवावे, त्यासाठी बॅंकांना डिजिटलायझेशन अनिवार्य आहे. त्याच्या तंत्रज्ञानासाठी होणारा मोठा खर्च सहकारातील सर्वच बॅंकांना परवडणारा नसल्याने सहकारी बॅंकांनी एकत्र येऊन समान सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विचार करावा,' असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड अर्बन बॅंकेच्या शताब्दी महोत्सवांतर्गत कऱ्हाड अर्बन बॅंक व दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅंक्‍स असोसिएशनच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित सहकारी बॅंकांच्या एकदिवसीय आयटी परिषद व्हीजन 2020 च्या, तसेच शताब्दी सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री प्रभू बोलत होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहाकर परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार संजय पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख व महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कऱ्हाड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, असोसिएशनच्या स्वाती पांडे, सतीश मराठे, ए. एस. रामशास्त्री आदी उपस्थित होते. 

मंत्री प्रभू म्हणाले, ""जगातील नवीन तंत्रज्ञानाच्या बदलांचा परिणाम आपल्यावर होणार असल्याने सहकारी बॅंकांनी त्या बदलाचा अभ्यास करत तो स्वीकारला पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञानातील बदलाचा काय परिणाम होईल याचा विचारही करू शकणार नाही, अशी स्थिती आहे. सहकारी बॅंकांनी बिझनेस प्लॅन केला पाहिजे. ज्या संस्था, कंपन्या डिजिटलायझेशन करतील त्याच भविष्यात टिकतील, अशी स्थिती आहे. डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेत भारत सर्वात पुढे असणारा देश आहे. सहकारी बॅंकांना डिजिटलायझेशन करताना होणारा मोठा खर्च विचार करता सहकारात एकत्र येऊन समान सेवा उपलब्ध कराव्यात, त्याद्वारे को- ऑपरेटिव्ह एटीएम, क्‍लाऊड तयार करावे. त्यामुळे खर्च विभागून तंत्रज्ञान स्वीकारणे सोयीचे होईल. नवीन बदलात सर्वात मोठी भूमिका सहकारी बॅंकांच बजावू शकेल. लोकांच्या गरजा वाढत जाणार आहेत. सहकारी बॅंकांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ असल्याने त्याचा फायदा होऊ शकेल. सहकार क्षेत्रातील विपरित परिणाम लक्षात घेऊन धोरणे आखावी लागणार आहेत. ते काम या परिषदेतून व्हावे. त्यादृष्टीने नव्या विचाराला आजपासून सुरवात करावी. सहकार क्षेत्राची काल आज उद्या गरज राहणार आहे. मात्र, त्यासाठी झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानातील बदल स्वीकारणे गरजेचे आहे.'' 

आमदार चव्हाण म्हणाले, ""आर्थिक क्षेत्रात सध्या वादळ सुरू आहे. देशात आर्थिक विकासाचा दर कमी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत बॅंकांसाठी अचूक निर्णय न घेतल्यास प्रश्‍न निर्माण होणार आहेत. शासनाचे नोटरहित अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. मात्र, ते साध्य होईल असे वाटत नाही. नोटरहित व्यवस्थेत बॅंकांचे काय होणार? नोटच राहिल्या नाहीत, तर बॅंकांच्या 13 लाख कर्मचाऱ्यांचे काय होणार? कऱ्हाड अर्बनने आयोजित केलेली ही आयटी व्हीजन परिषद सहकारी बॅंकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. बॅंकेने उभारलेला शताब्दी सभागृह शहराचे वैभव ठरणार आहे.'' 

माहिती व अद्ययावत तंत्रज्ञान सहकारी बॅंकांपर्यंत पोचविण्यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचे सांगून जोशी यांनी प्रास्ताविकात बदलत्या तंत्रज्ञानात सहकारी बॅंकांचे स्वरूप कसे असावे, यासाठी आयटी व्हीजन 2020 तयार करणार असल्याचे सांगितले. 

चरेगावकर यांनीही सहकारी संस्था सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या असल्याचे सांगून सहकार तळागाळापर्यंत पोचल्याने सरकारचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते "क्षितीज" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्ष डॉ. एरम यांनी परिषद घेण्यामागची भूमिका सांगितली. उपाध्यक्ष जोशी, गुरव यांनी स्वागत केले. मंजिरी ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. 

कऱ्हाडमध्ये नवीन विचाराला जन्म... 
मंत्री प्रभू यांनी भाषणाच्या सुरवातीलाच कऱ्हाडबद्दल गौरवोद्‌गार काढत पुढारले होण्यासाठी काय करायला हवे याचा अभ्यास करण्यासारखे वातावरण असल्याचे नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकाराचा विचार वाढवण्याचे काम याच परिसरात झाल्याचे सांगून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा नामोल्लेख केला. सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमुळेच तळागाळातील लोकांचा फायदा होऊ शकतो हे त्यांनी आवर्जून सांगून ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: karad news suresh prabhu Co-operative bank