महाराष्ट्रातील माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे की..; असं का म्हणाले शंभूराज देसाई? Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray

'आम्ही महाराष्ट्रातील एक इंचही जागा कर्नाटकात जावून देणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल ते करु.'

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे की..; असं का म्हणाले शंभूराज देसाई?

कऱ्हाड (सातारा) : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान आल्या-आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक इंचही महाराष्ट्रातील जमीन कर्नाटकात (Karnataka) जाणार नाही, असं सांगितलं आहे. हे मिळमिळीत उत्तर आहे का? उध्दव ठाकरे यांना नेहमी मिळमिळीत बोलायची सवय आहे, त्यामुळं त्यांना हे उत्तर मिळमिळीत वाटत असेल, अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे आज (शुक्रवारी) कऱ्हाड दौऱ्यावर आहेत. त्याच्या आढाव्यासाठी मंत्री देसाई काल कऱ्हाडामध्ये आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra-Karnataka Border) प्रश्नाच्या उच्चस्तरीय समितीची पुनर्गठण करण्यात आली असून त्याची व्याप्ती वाढवली आहे. त्यामध्ये नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तातडीनं समितीची बैठकही घेण्यात आली आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि माझ्यावर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशी आमचे काम सुरु झाले. संबंधित ८६५ गावांना शैक्षणिक, आरोग्य सुविधासह आणखी काय सुविधा देता येतील यावर आमचे काम सुरु झाले आहे. पुढच्या आठवड्यात चंद्रकांतदादा पाटील आणि मी सीमावर्ती भागातील बेळगावला जाणार आहोत. तिथं जावून तेथील नागरिक, पदाधिकारी, जनतेशी चर्चा करणार आहोत. एवढी सगळी पावले उचलूनही ते उध्दव ठाकरे यांना दिसत नसेल किंवा त्यांच्यापर्यंत जात नसेल तर त्यांना काय म्हणायचे ते म्हणुद्या. आम्ही महाराष्ट्रातील एक इंचही जागा कर्नाटकात जावून देणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल ते आम्ही सरकार म्हणून करु, असंही देसाईंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Jairam Ramesh : 'सावरकरांनी नेहमीच भारत तोडण्याचा प्रयत्न केला, BJP-RSS तेच करत आहे'

'राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही असहमत'

राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल आम्ही बिलकुल सहमत नाही. त्याबद्दल आम्ही मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे, असं सांगून मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आदर्श आहेत. ते हजारो वर्ष आदर्श राहतील. महाराजांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला आदर आहे. राज्यपालांचं वक्तव्य आलं, त्यावर आम्ही बिलकुल सहमत नाही. त्यावर आमच्या पक्षाचे वरिष्ठ मंडळी भूमिका काय घ्यायची हे ठरवतील. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचं वक्तव्य सहन करणार नाही. दरम्यान, कर्नाटकचे चॅनेल महाराष्ट्रातील बातम्या दाखवत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रातील माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना एवढे महत्व देण्याची गरज नाही, असं माझं मत असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं.