कर्नाटकी सत्तेचा मुंबईत रंगला ड्रामा..!

Congress
Congress

मुंबई - कर्नाटकच्या सत्तेचा आज पवईच्या हॉटेलसमोर जबरदस्त ड्रामा झाला. लोकशाहीचे हे वगनाट्य मुंबई पोलिसांच्या चिरेबंदी सुरक्षेने काँग्रेस नेत्यांची अटक व सुटका असे रंगले. 

कर्नाटकचे दहा बंडखोर आमदार हॉटेल रेनिसन्समध्ये तळ ठोकून होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे तख्त पलटवून लावण्याचा अखेरचा निर्णायक डाव या आमदारांनी टाकला होता. सलग तीन वेळा फसलेले ‘ऑपरेशन कमळ’ या वेळी परत कोमेजणार नाही, याची सर्व दक्षता घेण्यात आली होती. मात्र, कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार यांच्या दाक्षिणात्य फिल्मी स्टाइलने झालेल्या एंट्रीने लोकशाहीचे हे वगनाट्य अधिकच रंगले. आज सकाळी डी. के. शिवकुमार हे  हॉटेलच्या आवारात दाखल झाले. पण, बंडखोर आमदारांनी पोलिसांकडे तक्रार करीत डी. के. यांना हॉटेलात येण्यापासून रोखण्याची विनंती केली. त्यामुळे हॉटेलला पोलिसांचे कडे पडले होते. त्यातच डी.के. यांनी माझी रूम बुक असल्याचा पुरावा सादर केल्याने पोलिसांचीही पंचाईत झाली. पण, व्यवस्थापनाने डी. के. यांचे बुकिंग रद्द केले. या अडवणुकीमुळे डी. के. यांनी ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला, अन्‌ काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली. त्यातच बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी ‘डी.के. गो बॅक’च्या घोषणा दिल्या. दरम्यान, मिलिंद देवरा, संजय निरुपम, नसीम खान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हॉटेलकडे पोचले. अखेर वाढता तणाव पाहून पोलिसांनी शिवकुमार यांच्यासह सर्व नेत्यांना ताब्यात घेऊन कलिना विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. सायंकाळी शिवकुमार यांना कर्नाटकला रवाना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com