
Kartik Vajir : लोकशाहीवरील भाषणामुळं चर्चेत आलेल्या कार्तिकला दृष्टीदोष! CM शिंदे करणार संपूर्ण उपचार
दोन दिवसांपूर्वी शाळेतील एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात विनोदी भाषण करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. "आजपासून भारतात लोकशाही लागू झाली असून आपण लोकशाहीमध्ये काहीही करू शकतो. मला तर मोक्कार धिंगाणा करायला आवडतं" अशा भाषणामुळे त्याने लोकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावलं होतं.
कार्तिक वजीर असं या चिमुकल्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्याची माहिती आहे. या शाळेतील तो पहिलीचा विद्यार्थी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरची परिस्थितीही बिकट असून तो लहानपणापासून खोडकर असल्याची माहिती आहे. त्याला रातांधळेपणा हा आजार असल्यामुळे त्याला दिसायला कमी आहे. त्यामुळे तो वर्गात फळ्याच्या जवळ बसतो. तर तो दिसायला गोरा असल्यामुळे त्याला सर्वजण भुऱ्या या नावाने चिडवतात अशी माहिती मिळाली आहे.
कार्तिकच्या या रातांधळेपणाचा उपचाराचा खर्च आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. या कार्तिकच्या परिवाराशी मुख्यमंत्री कार्यालयाने संपर्क साधला आहे. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत त्याच्या डोळ्यांवर मोफत उपचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी संवाद साधला. कार्तिक वजीर याला दृष्टिदोष आहे. त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.
त्याने भाषणात काय म्हटलं होतं?
"लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात आणि काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खूप गरिब आहे, माझ्याएवढा गरिब अख्ख्या तालुक्यात कुणीच नसेल" अशा शब्दांत भाषण करत त्याने अक्षरश: प्रेक्षकांची मने जिंकली होती.