Kartiki Ekadashi Yatra : बा विठ्ठला, राज्यातील जनतेची मनोकामना पूर्ण कर! उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाचरणी साकडे

श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली.
Kartiki Ekadashi Yatra Pandharpur
Kartiki Ekadashi Yatra PandharpurSakal

पंढरपूर - बा विठ्ठला, राज्यातील शेतकरी, कष्टकरी यांच्यासह सर्वांची संकटे दूर करून सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राणाजगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, भागवत धर्माची पताका पिढ्यान्‌पिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. धर्मावर कितीही आक्रमणे झाली तसेच संकटे आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही, त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली. महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला.

सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने श्री. फडणवीस, अमृता फडणवीस, मानाचे वारकरी व उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्तिकी यात्रेसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत त्यांनी धन्यवाद दिले. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान १२ तास लागत होते. यावेळी योग्य नियोजन केल्याने हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आला असल्याचे नमूद केले. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी आभार मानले.

पहिल्या टप्प्यातील २६ कोटीच्या कामाचा शुभारंभ

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाच्या ७३ कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील २६ कोटी रुपयांच्या कामाचे आज भूमिपूजन झाले. कोट्यवधी लोकांच्या भावना या कार्याची जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे, अशा अपेक्षाही श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदारांनी हे काम काळजीपूर्वक करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी केल्या. दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रभागा संवर्धनासाठी उपाययोजना - फडणवीस

श्री. फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. कोणालाही विस्थापित व्हावे लागणार नाही. तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. चंद्रभागा नदी अविरतपणे वाहत राहिली पाहिजे, यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाय करण्यात येतील.

नदी स्वच्छ राहिली पाहिजे, यासाठी नदी पात्रात नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी दाम्पत्य मानाचे वारकरी

शासकीय महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून दर्शन रांगेतील माळकरी दाम्पत्याची निवड केली जाते. यंदा नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे व वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.

हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत प्रवासाचा पास देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com