मुंबईत "केडीएमसी पॅटर्न'ची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत. यावरून हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररीत्या लढणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वबळावर लढायचे आणि त्यानंतर सत्तेत एकत्र यायचे हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पॅटर्न मुंबईतही राबविला जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील संवाद सध्या थांबला आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंनी स्वबळाची जोरदार तयारी सुरू आहे. "मातोश्री'वर आज मुंबईसह नाशिक, पुणे आदी शहरांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तर भाजपचे मुंबईतील आमदार व पदाधिकारी यांनी दादर येथील कार्यालयात स्वबळाच्या ताकदीचा आढावा घेतला. त्यामुळे युतीची शक्‍यता धूसर झाली आहे. परिणामी, शिवसेना आणि भाजप "मैत्रिपूर्ण' लढत देतील आणि त्यानंतर एकमेकांची मदत घेऊन सत्ता स्थापन करतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत हे दोन्ही पक्ष स्वबळार लढले. प्रचारात दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर तुटून पडले. मात्र नंतर सत्तेसाठी एकत्र आले.

उद्धव आज काय बोलणार?
तुम्ही युती होईल की नाही याबाबत विचार करू नका. तर विजयासाठीच लढा, असा सक्‍त आदेश उद्धव ठाकरे यांनी आज "मतोश्री'वर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला असल्याचे समजते. उद्या (ता. 26) गोरेगावात उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या मेळाव्यात युतीबाबत भाष्य करतील.

भाजपच्या गोटात शांतता
चर्चेत सहभागी नेत्यांनी किंवा इतर कोणीही शिवसेनेविषयी भाजपच्या बाजूने वाचाळ विधाने अथवा टीका करू नये, असे सक्‍त आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असल्याचे समजते. त्यामुळे सध्या भाजपचा कोणताही नेता युतीबाबत अथवा शिवसेनेबाबत थेट भाष्य करण्याचे टाळत आहे. शिवसेनेकडून सुधारित नवा प्रस्ताव येण्याची आशा भाजप नेत्यांना लागली आहे. आज दिवसभर भाजपचे नेते शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहत बसले होते असे समजते.

Web Title: KDMC pattern in mumbai