Kerala Floods : गावे, घरे अजूनही पाण्यातच 

ज्ञानेश सावंत 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

अल्लपी : पुराने वेढलेल्या गावातील पाणी ओसरल्याने ग्रामीण भाग सावरल्याचे आशादायी चित्र पाहता येईल, या आशेने केरळमधील अनेक जिल्हे फिरूनही तशी परिस्थिती कुठेच दिसली नाही. अल्लपी आणि कोल्लम शहरालगत तर साठलेले पाणी आणखी महिनाभर कायम राहण्याची शक्‍यता आहे. या भागांतील लोकांचे जीव वाचले; पण त्यांची साधनसंपत्ती मात्र वाचविता आली नाही. 

या भागातील घरे, छोटे-मोठे उद्योग, शाळा व महाविद्यालये पाण्यामुळे पुरते उद्‌ध्वस्त झाले आहेत. या गावांना आता पुन्हा उभे राहण्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याचे चित्र आहे. येथील 14 पैकी 11 जिल्ह्यांत पुराचे पाणी शिरले असून, त्याचा त्रिशूर, एर्नाकुलम व अल्लपी येथील बहुतांशी गावांना फटका बसला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने काही भागांतील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे अल्लपीतील गावांची पाहणी करता आली. मात्र, त्या ठिकाणी चिंताजनक चित्र दिसून आले. मदतकार्यासाठी झटणाऱ्या यंत्रणा तोकड्या ठरल्या असून, येथील गावांपर्यंत पोचणेही अवघड आहे. त्यामुळे पुराच्या संकटात सापडलेल्या केरळला उभे राहण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. 

दरम्यान, उत्तर केरळमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तर, दक्षिण केरळमध्ये स्थिती चांगली असेल, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र, दक्षिण केरळमधील लोकही घाबरले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

घरांपर्यंत पोचणेही अवघड 
पुरादरम्यान शिबिरातील सोय केलेल्या नागरिकांमधील 7 हजार व्यक्तींना रविवारी सकाळी गावांपर्यंत नेण्यात आले. यातील काही जणच घरापर्यंत पोचू शकले. गावातील परिस्थिती अजूनही धोक्‍याची असल्याने उर्वरितांना पोलिस बंदोबस्तात बोटमधून पुन्हा शिबिरात नेण्यात आले. 

Web Title: Kerala Floods : The villages, houses still in the water