
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे.
'सेनेशी संबंध असलेल्या अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलिस खात्याचा सन्मान वाढला का?'
अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे राज्याचे राजकारण गढुळ झाले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपाचे केशव उपाध्ये यांनी हत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'सचिन वाझे काही लादेन आहे का?' असा सवाल करत वाझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे. ट्विटद्वारे शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.
केशव उपाध्ये काय म्हणतात ट्विटमध्ये
'सचिन वाझे काही लादेन आहे का?, असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेही शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे.
एका सामान्य पोलिस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला पाहिजे. तसेच हे दोघे पोलिस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे. बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलिस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलिस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचं उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या राजकारण तापलंय. यात आणि सचिन वाझेच्या प्रकरणाने पुन्हा एकदा भाजप आणि सेनेतील वाद चिघळणार का असा सवाल उपस्थित होतं आहे. आता केशव उपाध्ये यांनी या वादात उडी घेतल्याने सेना नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया हे पाहावे लागणार आहे.