
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वंचित-काँग्रेसची आघाडी?, कॉंग्रेस नेत्यासोबत आंबेडकरांची गुप्त बैठक
सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यातील नेत्यांनी पक्षबांधणीसाठी मोठी तयारी केली असल्याचे चित्र आहे. याशिवाय बैठका, सभा यांना मागील काही दिवसांपासून जोर आला आहे. या सगळ्यात आता एक वेगळी राजकीय बातमी समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच एक गुप्त बैठक झाल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले असून लवकरच काँग्रेसमधील बड्या नेत्यांसोबत प्रकाश आंबेडकर यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वंचित-काँग्रेसची आघाडी होणार का यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा: 'अजान वाजणार नाही, पण साईंची काकड आरती थांबवू नका'
राज्यात सध्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी कार्यरत आहे. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीत हे तिन्ही सत्ताधारी पक्ष आघाडी म्हणून उतरण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी स्वतंत्र लढण्याच्या हिशोबाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेचा मुंबईतील जनाधार मोठा आहे. काँग्रेसचा जनाधार घटलेला असल्याने काँग्रेसची अव्वाच्या सव्वा जागांची मागणी शिवसेना मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळेच या निवडणुकीत नेमकी कोणती राजकीय समीकरणे जुळतील याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, शिवसेनेसोबत आघाडी न झाल्यास मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याशिवाय काँग्रेस पक्षाला पर्याय असणार नाही. त्याबाबतच्या घोषणाही काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी सूत जुळवण्याचे प्रयत्न मुंबई काँग्रेसने सुरू केल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. याबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची एक बैठक मुंबईत पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही आघाडी व्हावी यासाठी मुंबई काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले असून, याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीय मते दुरावली होती. ही मते पुन्हा आपल्या पारड्यात पडण्यासाठी मुंबई काँग्रेसने हे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा: पंतप्रधान म्हणून चांगलं कोण, शरद पवार की उद्धव ठाकरे? खासदार शिंदे म्हणतात...
Web Title: Bmc Election Congress Bhai Jagtap And Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Meeting In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..