Kirit Somaiya I सोमय्यांच्या रडावर शिवसेनेचा आणखी एक नेता; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमय्यांच्या रडावर शिवसेनेचा आणखी एक नेता

आता सोमय्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक याच्यांवर निशाणा साधला आहे.

सोमय्यांच्या रडावर शिवसेनेचा आणखी एक नेता

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून टोलेबाजी सुरु आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्यापासून ते हनुमान चालीसा पठणाच्या विषयांत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, आता आणखी एक वेगळी बातमी समोर येत आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. भाजपाचे किरीट सोमय्या यांनी आज दुपारी 1 वाजता मुंबई हायकोर्टात ठाकरे सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचा माहिती ट्विटद्वारे दिली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोप करताना दिसतात. अशातच आता सोमय्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक याच्यांवर निशाणा साधला आहे. यांच्याविरोधात आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आज दुपारी 1 वाजता मुंबई हायकोर्टात ठाकरे सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 18 कोटीचा दंड माफी आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात याचिका दाखल करणार आहोत, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सरनाईक यांचा हिरानंदनी येथील राहता फ्लॅट आणि मीरारोडमधील जमिनीचा समावेश असून एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी ईडीने दिली होती. काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. सरनाईकांवरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहे.