
राणा दाम्पत्यासाठी किरीट सोमय्यांची पुन्हा दिल्ली दरबारी धाव
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास करणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दिल्लीकडे धाव घेतली आणि या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या दिल्लीला जात आहेत. यावेळी कारण ठरलं आहे राणा दाम्पत्य.
हेही वाचा: किरीट सोमय्या तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली होती. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. नाट्यमय घडामोडी आणि तणावपूर्ण वातावरणानंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली. १२ दिवस कारागृहात काढल्यानंतर त्यांची काल जामिनावर सुटका झाली. दरम्यान नवनीत राणा यांनी आपल्याला कारागृहात अयोग्य वागणूक मिळाल्याचे आरोप केले.
नवनीत राणा यांचा स्पाँडिलायसिस आजार बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन राणा दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी राणा दाम्पत्याने आपले कारागृहातले अनुभव किरीट सोमय्यांना सांगितले. हे अनुभव ऐकून आपल्याला खूप मोठा धक्का बसला असून त्यांचे अनुभव ऐकून इंग्रजांच्या काळातल्या तुरुंगाची आठवण झाल्याचं सोमय्या म्हणाले.
हेही वाचा: राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली : सोमय्या
नवनीत राणांना स्पाँडिलायसिसचा त्रास आधीपासूनच होता, मात्र त्यांना ज्या पद्धतीने फरशीवर झोपवलं, चौकशीसाठी बसवून ठेवलं, त्यामुळे त्यांचा त्रास बळावल्याचं सोमय्यांनी सांगितलं. ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याला तुरुंगात दिलेल्या वागणुकीबद्दलच आपण दिल्लीला जात असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच हवाला एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी, उदय शंकर महावर यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरणातल्या कारवाईचा पाठपुरावा हाही एक उद्देश असल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे.
Web Title: Kirit Somaiyya Meeting In Delhi Navneet And Ravi Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..