राजमाता जिजाऊंच्या जीवनावर हिंदीत खंडकाव्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

देशभरात पोचणार कार्य; डॉ. पद्मा पाटील यांचा प्रकल्प; १८० पाने पूर्ण

कोल्हापूर - राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित हिंदी भाषेत ‘जिजामाता’ खंडकाव्य लवकरच प्रकाशित होणार आहे. हिंदी भाषेतून जिजाऊंच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी ते लिहिले असून, खंडकाव्याची सुमारे १८० पाने लिहून तयार झाली आहेत. त्यानिमित्ताने हिंदीतून जिजाऊंचे कार्य देशभर प्रसारित होण्यास मदत होणार आहे. 

मराठा स्त्रियांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी पुस्तके हिंदी भाषेत किती आहेत, याचा शोध घेतल्यास त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते, अशी स्थिती आहे. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई, करवीरकर जिजाबाई यांच्या कार्य कर्तृत्‍वाचा प्रसार देशभर प्रसारित होणे आवश्‍यक असताना, त्यांच्यावर आधारित हिंदी भाषेत साहित्यच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. ‘साहित्य और इतिहास’ या हिंदी भाषेतील पुस्तकात डॉ. पाटील यांनी लिहिलेल्या लेखात ‘जिजाऊं’च्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांनी मराठा स्त्रियांच्या कार्यकर्तृत्‍वावर भर देण्याच्या उद्देशाने जिजाऊ, ताराराणी यांच्यावर छोटे-मोठे लेख हिंदीतून लिहिले आहेत. 

जिजाऊंवर हिंदीतून खंडकाव्य लिहिण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्या गेली चार-पाच वर्षे प्रयत्नशील होत्या. विभागप्रमुख असल्याने विभागाचे प्रशासन हाताळत त्यांनी खंडकाव्य लिहिण्यास सुरवात केली होती. त्यास मुर्त स्वरूप आले असून, सुमारे १८० पाने लिहून तयार झाली आहे.

खंडकाव्यात शिवछत्रपतींवर जिजाऊँनी संस्कार कसे केले, शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वीची पराक्रमी व्यक्तिमत्त्वे कोण, शिवरायांवर संस्कारांसाठी पुराणासाठी कशा पद्धतीने आधार घेतला, याचा उल्लेख आहे. लखुजी जाधव यांच्या छत्रछायेत जिजाऊँनी युद्धकलेचे घेतलेले प्रशिक्षण, जिजाऊँनी शिवरायांच्या मनात स्वराज्य व स्वाभिमानाचे रूजविलेले बीज, याचाही ऊहापोह केला आहे.

फ्रान्समधील ॲना हिचा लहान मुलांवर कशा पद्धतीने संस्कार केले जातात, याविषयी प्रकल्प होता. तिला जिजाऊंनी शिवरायांवर संस्कार कसे केले, याचा उल्लेख मिळाला. त्यामुळे जिजाऊ व शिवराय यांच्याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी ती भारतात आली होती. कोल्हापुरात आल्यानंतर तिची भेट झाली. तिला जिजाऊंबद्दल इतके आकर्षण वाटले, तर मग आपण जिजाऊंवर का खंडकाव्य लिहू नये, असा विचार त्यावेळेपासून मनात घोळत होता. हा विचार आता खंडकाव्याच्या माध्यमातून सत्यात उतरत आहे. 
- डॉ. पद्मा पाटील, हिंदी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.

Web Title: kolhapur maharashtra news rajmata jijau hindi Volume poetry