जितेंद्रच्या घरात सापडल्या अश्‍लील "सीडी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून झालेल्या बहुचर्चित खून खटल्याप्रकरणी आज सुनावणी सुरू झाली. आजच्या सुनावणीत आरोपीच्या घराची झडती घेतेवेळी असलेला एक पंच, दुचाकी विक्रेता दुकानाचा व्यवस्थापक आणि घटनास्थळाचे छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकाराची साक्ष झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या घरात पोलिसांना सहा अश्‍लील सीडी सापडल्याचे पंचाने न्यायालयासमोर सांगितले. 

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून झालेल्या बहुचर्चित खून खटल्याप्रकरणी आज सुनावणी सुरू झाली. आजच्या सुनावणीत आरोपीच्या घराची झडती घेतेवेळी असलेला एक पंच, दुचाकी विक्रेता दुकानाचा व्यवस्थापक आणि घटनास्थळाचे छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकाराची साक्ष झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या घरात पोलिसांना सहा अश्‍लील सीडी सापडल्याचे पंचाने न्यायालयासमोर सांगितले. 

विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. आजच्या सुनावणीत दोन साक्षीदार तपासण्यात आले. तर घटनास्थळाचे छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकाराची सरतपासणी झाली. त्यांची उलट तपासणी उद्या होणार आहे. या प्रकरणाची सलग चार दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. 

मुख्य आरोपी जितेंद्र याने नव्याने खरेदी केलेल्या दुचाकी विक्रेत्या दुकानाच्या व्यवस्थापकाने साक्ष देताना सांगितले, ""11 जुलै रोजी जितेंद्र मित्रासोबत दुकानात आला होता. त्याने रोख 45 हजार रुपये देऊन नवीन दुचाकी नेली व राहिलेले 15 हजार रुपये नंतर देण्याचे ठरले. त्यानंतर 22 जुलै रोजी दुकानात पोलिस आले आणि त्यांनी पोलिस ठाण्यात दुचाकी विकल्याबाबत जबाब घेतले. पोलिसांनी दाखवलेली दुचाकी जळालेल्या अवस्थेत होती. ती आमच्याकडून खरेदी केलेलीच दुचाकी असल्याचे त्या वेळी मी सांगितले.'' 

आरोपीच्या घराची झडती घेताना उपस्थित असलेल्या पंचापैकी एका पंचाने साक्षीत सांगितले की, "मी 21 जुलै रोजी पोलिसांसोबत आरोपी जितेंद्र याच्या घराचा पंचनामा करण्यासाठी गेलो. जितेंद्रच्या घरात टीव्हीजवळ आठ "सीडी' सापडल्या. त्यापैकी सहा सीडी अश्‍लील होत्या. तेथे सापडलेल्या एका मोबाईलवरही रक्ताचा डाग होता. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. 

घटनास्थळाचे छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकाराची विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी सरतपासणी घेतली. या वेळी न्यायालयाकडे एक मेमरी कार्ड व काही छायाचित्रे देण्यात आली. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवत "दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अशा वस्तू न्यायालयाला देण्याबाबत कायद्यात कोठेही उल्लेख नाही,' असे म्हणणे मांडले. त्यावर ऍड. निकम यांनी, "न्यायाच्या हिताच्या दृष्टीने असलेली कागदपत्रे केव्हाही सादर करता येतात, याच प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे असल्याचे सांगून ऍड. निकम यांनी एक न्यायनिवाडा न्यायालयासमोर वाचून दाखवला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचे म्हणणे फेटाळले. आरोपीतर्फे ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. प्रकाश आहेर यांनी बाजू मांडली. 

भैलुमेच्या वकिलाचे दोन अर्ज 
आरोपी भैलुमे याला बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा देण्याची परवानगी द्यावी. तसेच त्याला कारागृहात पुस्तके उपलब्ध करून देण्याची मुभा देण्यासंदर्भात एक, तर भैलुमे याला माहितीचे अधिकाराचे अर्ज देण्यास परवानगी द्यावी, असे दोन अर्ज त्याच्या वकिलांनी केले आहेत. त्यावरही उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

Web Title: kopardi case