मुलीचे कपडे पाहून आईला रडू कोसळले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नगर - कोपर्डी येथील बलात्कार व खून खटल्यात पीडित मुलीच्या आईची साक्ष आज नोंदविण्यात आली. घटनेनंतर पहिल्यांदाच मुलीचे कपडे आणि सोन्याची रिंग पाहून आईला रडू कोसळले. न्यायालयातील उपस्थितांचेही डोळे त्या वेळी पाणावले होते. 

नगर - कोपर्डी येथील बलात्कार व खून खटल्यात पीडित मुलीच्या आईची साक्ष आज नोंदविण्यात आली. घटनेनंतर पहिल्यांदाच मुलीचे कपडे आणि सोन्याची रिंग पाहून आईला रडू कोसळले. न्यायालयातील उपस्थितांचेही डोळे त्या वेळी पाणावले होते. 

विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यात आतापर्यंत 11 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज पीडित मुलीच्या आईची सरतपासणी घेतली. त्या वेळी आईने सांगितले, की ""मुलगी 12 जुलै 2016 रोजी शाळेत गेली नव्हती. तिला विचारले "तुला बरे नाही का?' ती "नाही' म्हणाली. दुसऱ्याही दिवशी ती शाळेत गेली नाही. दिवसभर झोपून होती. मोठी मुलगी कॉलेजमधून आल्यानंतर तिने तिला "शाळेत का जात नाही,' असे विचारले. तेव्हा "आरोपी पप्पू शिंदे व त्याचे मित्र अश्‍लील भाषेत बोलतात. मोटारसायकलवरून पाठलाग करतात. परवा शाळेतून येत असताना मोटारसायकल आडवी लावून पप्पू शिंदेने हात धरला. मी त्याला ढकलून दिले. त्यांची भीती वाटते,' असे तिने सांगितले.'' 

""सायंकाळी चहा घेतल्यानंतर तिने अंड्याची भाजी खायची असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघींना आजोबांच्या घरून मसाला आणण्यास सांगितले; पण मोठी मुलगी अभ्यास करत असल्याने ती एकटीच सायकलवरून गेली होती. बऱ्याच वेळानंतरही ती न आल्याने आम्ही दोघी मोबाईल व बॅटरी घेऊन तिला शोधण्यासाठी निघालो. रस्त्यात पुतण्या व त्याचे दोन मित्र मोटारसायकलवरून येताना दिसले. त्यांना "मुलगी दिसली का?' विचारले. "दिसली तर ताबडतोब घरी पाठवा,' असेही त्यांना सांगितले होते. त्याच्याच मोटारसायकलमागे दोघी चालत गेलो. काही अंतरावर रस्त्यात मोटारसायकल उभी दिसली. मुलीची सायकलही रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. पुतण्या तिला हाक मारत होता. आम्ही आवाजाच्या दिशेने गेलो. पुतण्या म्हणाला, "पप्प्या, तेथे काय करतोस?' तेवढ्यात तो पळाला. लिंबाच्या झाडाजवळ गेलो असता मुलगी नग्नावस्थेत बेशुद्ध होती. तिच्या अंगावर जखमा होत्या. ओठांवर चावे घेतलेले दिसत होते. दोन्ही हात पिरगळलेले होते. पुतण्या शिंदेच्या मागे पळाला. मुलीकडे पाहून माझी दातखीळ बसली होती. चुलत सासू आल्यानंतर त्यांनी मुलीच्या अंगावर साडी टाकली. नंतर तिला दवाखान्यात नेले.'' 

ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणी घेतली. दरम्यान, खटल्याची पुढील सुनावणी 13 ते 18 फेब्रुवारी या काळात ठेवण्यात आली आहे. 

तिन्ही आरोपींना ओळखले! 
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आज न्यायालयात तिन्ही आरोपींना ओळखले. तिघेही कोपर्डी गावातच राहत असल्याचे सांगितले. आईने मुलीचे कपडे, सायकल व सोन्याची रिंग ओळखली. त्या वेळी ती ढसाढसा रडली. त्यामुळे काही वेळ न्यायालयाचे कामकाज थांबविले होते. 

Web Title: kopardi rape case