दंगलीत मी दगड मारलेला पाहिलेल्या 'त्या' बाईंचीच चाचणी करा: संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

येत्या 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर कोरेगाव भीमा प्रकरणी जे आरोपी आहेत ते शोधून काढावेत. या साठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत. दंगलीत नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घ्या. दंगलीमधील खरे आरोपी दंगल खोर कोण, हे पडताळणे गरजेचे आहे.

सांगली : राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा वापर करण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे महाराष्ट्र पेटला. या प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला.

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला उसळलेल्या दंगलीत मोठे नुकसान झाले होते. तसेच एकाचा मृत्यूही झाला होता. या दंगलीप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. एकबोटेंना अटक झाली असून, सध्या ते कारागृहात आहेत. मात्र, अद्याप संभाजी भिडे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

या प्रकरणी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेत संभाजी भिडे म्हणाले, की येत्या 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर कोरेगाव भीमा प्रकरणी जे आरोपी आहेत ते शोधून काढावेत. या साठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत. दंगलीत नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घ्या. दंगलीमधील खरे आरोपी दंगल खोर कोण, हे पडताळणे गरजेचे आहे. विनाकारण मिलिंद एकबोटे आणि माझे नाव त्यामध्ये घेतले जात आहे. जे घडलेलेच नाही त्याचा ओवा पोटा चालू आहे. हे सगळे विद्वेषाने पेटले आहेत, हे महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम सुरू आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी योग्य तपास करावा आणि कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्रात 28 मार्चपासून मोर्चे आंदोलन सुरू करणार आहोत. मी दंगलीमध्ये दगड मारला, हे ज्या बाईंनी बघितले त्यांची सरकारने ब्रेन मॅपिंग चाचणी करावी. सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे, हे खरंच लोकशाहीला घातक आहे. एल्गार परिषद घेणाऱ्यांना तात्काळ अटक करा.

Web Title: Koregaon Bhima riot Sambhaji Bhide criticize Prakash Ambedkar