कोयना भूकंप पुनर्वसन निधी प्रतिवर्षी 10 कोटी रुपये - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - कोयना भूकंप पुनर्वसनासाठी महाजनकोमार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा भूकंप पुनर्वसन निधी हा 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई - कोयना भूकंप पुनर्वसनासाठी महाजनकोमार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा भूकंप पुनर्वसन निधी हा 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या विश्वस्त मंडळाची आज विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराज देसाई, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, सदानंद चव्हाण, प्रधान सचिव सुनील पोरवाल, नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोयना परिसरात वारंवार कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के बसत असतात व त्यामुळे घरे, इमारतींना तडे जाणे यासह इतर नुकसान होत असते. अशावेळी शाळा, घरे इत्यादींचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना आदी कामांकरिता कोयना भूकंप पुनर्वसन निधी दिला जातो. या निधीचे वितरण भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या निर्णयानुसार करण्यात येते. महाजनकोमार्फत दिला जाणारा हा निधी प्रतिवर्षी 10 कोटी रुपये इतका करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

दरम्यान, दुसऱ्या एका बैठकीत पाटण तालुक्‍यातील विविध विकासकामांच्या अंमलबजावणीबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती घेऊन सूचना दिल्या.

Web Title: Koyna Earthquake Rehabilitation Fund annually Rs 10 crore