तव स्मरण आम्हां सतत स्फुर्तीदायी घडो..!

अभय दिवाणजी
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

एखाद्या चित्रपटात शोभेल असाच तो प्रसंग... चित्रपटातील हिरो अतिरेक्‍यांच्या तावडीतून अपहृत नागरिकांची सुटका करीत असताना त्याचा कस लागत असल्याचे नेहमीच पाहतो. तो यशस्वी होतो. ते सारे चित्रपटापुरते असते. परंतु अगदी तसाच प्रकार प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडला. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला परतावून लावताना एका इमारतीत अडकलेल्या 20 जणांना सैन्यदलातील मेजर कुणालगीर गोसावी सर्व ताकदीनिशी सोडवतो. पायाला गोळी लागून जखमी अवस्थेतही एकविसाव्या व्यक्तीच्या सोडवणुकीसाठी त्याची धडपड चाललेली असते अन्‌ शत्रूने केलेल्या हल्ल्यात तो शहीद होतो. काळही इतका कसा निष्ठूर होतो हे समजत नाही.

एखाद्या चित्रपटात शोभेल असाच तो प्रसंग... चित्रपटातील हिरो अतिरेक्‍यांच्या तावडीतून अपहृत नागरिकांची सुटका करीत असताना त्याचा कस लागत असल्याचे नेहमीच पाहतो. तो यशस्वी होतो. ते सारे चित्रपटापुरते असते. परंतु अगदी तसाच प्रकार प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडला. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला परतावून लावताना एका इमारतीत अडकलेल्या 20 जणांना सैन्यदलातील मेजर कुणालगीर गोसावी सर्व ताकदीनिशी सोडवतो. पायाला गोळी लागून जखमी अवस्थेतही एकविसाव्या व्यक्तीच्या सोडवणुकीसाठी त्याची धडपड चाललेली असते अन्‌ शत्रूने केलेल्या हल्ल्यात तो शहीद होतो. काळही इतका कसा निष्ठूर होतो हे समजत नाही. कुणालगीरने केलेल्या साहसामुळे आपलीही मृत्यूच्या "त्या' दाढेतून सुटका झाली. पण आता तोच देशासाठी शहीद झाल्याचे सांगताना त्याचे पार्थीव आणणाऱ्या त्याच्या सहकाऱ्याने अश्रू ढाळत कहाणी कथन केली... ही घटना नगरोटा (काश्‍मिर) येथील दहशतवादी हल्ल्यावेळी घडली. या हल्ल्यात सात सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. त्यातीलच एक कुणालगीर मुन्नागीर गोसावी. त्याचे स्मरण आम्हा साऱ्यांना होत राहणारच आहे. त्याच्याबद्दल आता इतकेच म्हणावे लागेल... तव स्मरण आम्हां सतत स्फुर्तीदायी घडो..!

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा तो रहिवासी. कुणालगीरचा जन्म सधन कुटुंबात झालेला... सैन्यदलाबाबत त्याला प्रचंड आकर्षण. यातूनच कवठेकर प्रशालेत असताना तो एनसीसीत गेला. एनसीसीच्या सर्वच प्रशिक्षणात उत्साहाने तो सहभागी होत असे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेड आवर्जून पहात असे. सैन्यदलात बडा अधिकारी होण्याचेच त्याचे स्वप्न... त्याच्या कुटुंबियांनीही त्याला यासाठी प्रोत्साहन दिले. सैन्यदलातील आपल्या या कर्तृत्ववान मुलाचा वडील मुन्नागीर यांना प्रचंड अभिमान ! घरातील शेंडेफळ. पण धाडसी व्यक्तिमत्वामुळे नेहमीच सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर. पदवीची परीक्षा झाल्यानंतर थेट सैन्यदलात लेखी परीक्षा, मुलाखतीतून लेफ्टनंट पदावर 2007 मध्ये तो रुजू झाला. नऊ वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी काम करताना मणिपूरसारख्या सीमावर्ती भागाची मोठी जबाबदारी त्याने पेलली. सियाचीनसारख्या बर्फाच्छादित ठिकाणी त्याने देशाच्या सीमा मजबूत ठेवण्यात आपले योगदान दिले. सेवेतील सर्वात महत्त्वाचा कामगिरी पार पाडताना "जीवनातील अभिमानाची जबाबदारी' असा तो आवर्जून उल्लेख करीत असे. अत्यंत कमी वयात त्याला सैन्यदलातील महत्त्वाची पदे मिळाली होती. सैन्यदलातील सर्वात महत्त्वाचे पद भूषविण्याचा त्याचा मानस होता.

सर्जिकल स्ट्राईकमुळे सुट्टी मिळत नव्हती. पण गेल्या महिना अखेरीस सुट्टी मिळाल्याने तो पंढरपुरात घरी आला होता. नगरपालिका निवडणुकांचा तो काळ होता. रविवारी (ता. 27 नोव्हेंबर) मतदान होते. आणखी दोन दिवस रहा... मतदानानंतर मी तुला सोडवायला येतो असे वडिलांनी सांगताच त्याने वरिष्ठांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश दिल्याचे बजावत देश रक्षणासाठी तो शनिवारी (ता. 26 नोव्हेंबर) पत्नी उमा, मुलगी उमंगसोबत जम्मूकडे रवाना झाला. सोमवारी (ता. 28 नोव्हेंबर) तो ड्युटीवर रुजू झाला. मंगळवारी (ता. 29 नोव्हेंबर) दहशतवादी हल्ला झाल्याचा निरोप देत वरिष्ठांनी तातडीने हल्ल्याचे ठिकाण गाठण्याचे आदेश दिले. पत्नी उमाने पंढरपुरात मुन्नागीर यांना दहशतवादी हल्ल्याला परतावून लावण्यासाठी कुणालगीर गेल्याचे सांगून परमेश्‍वराकडे प्रार्थना करण्यास विनविले.

दहशतवाद्यांनी नगरोटा भागात जोरदार हल्ला केला होता. एका इमारतीत 21 जण अडकले होते. त्यातील 20 जणांना कुणालगीर आणि त्याच्या सहकाऱ्याने वाचविले. यावेळी त्याच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. सहकाऱ्यांनी त्याला परतण्याचे आवाहन केले. परंतु उर्वरित एकाचा जीव वाचविणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत तो दहशतवाद्यांशी सामना करु लागला. अगदी याचवेळी त्याला विरगती प्राप्त झाली. या संदर्भात त्याच्या घरी निरोप देण्यात आला. त्याचे पार्थीव पंढरपुरात आणण्यात आले. पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळला. पंढरपूर व मंगळवेढेकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून श्रद्धांजली वाहिली. शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्कारास लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. ज्या शाळेत तो शिकला त्या कवठेकर प्रशालेने अंत्ययात्रेत पुष्पवृष्टी केली. अंत्ययात्रेच्या मार्गावर संस्कार भारतीने रांगोळीच्या पायघड्या घातल्या. वाखरी (ता. पंढरपूर) येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन वर्षे वयाच्या उमंगने भडाग्नी दिला. वाखरीच्या ग्रामस्थांनी त्याचे स्मारक बनविण्याचा ठराव केला आहे. नेहमी भक्तीचा महापूर वाहणाऱ्या पंढरीत त्या दिवशी मात्र देशभक्तीचा महापूर पहावयास मिळाला.

कुणालगिरचे स्वप्न सैन्यात मोठा अधिकारी होण्याचे होते. तो मेजर पदापर्यंत गेला होता. तो शहीद झाला तो आमचा अभिमान आहे. त्याची मुलगी उमंग हिलाही सैन्यात अधिकारी बनविण्याचा स्वप्न आहे.

- मुन्नागीर गोसावी (शहीद कुणालगीरचे वडील)

Web Title: Kunalgir Gosawi Memories written by Abhay Diwanji