

तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांचा दरमहा मिळणारा १,५०० रुपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. दुसरीकडे, मागील दोन वर्षांत ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांच्या नोंदणीसाठी अद्याप ‘लाडकी बहीण’चे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. ऑगस्टपासून या योजनेचा लाभही वितरित करण्यात येऊ लागला. काही दिवसांतच महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करून लाडक्या बहिणींना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालाच नाही. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सुरुवातीला लाभ देण्यात आला. त्यानंतर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. त्यात राज्यातील एक-दोन लाख नव्हे, तर तब्बल ८२ लाख महिला अपात्र आढळल्या. आता यापुढे केवळ पात्र महिलांनाच दरमहा १,५०० रुपये मिळणार आहेत.
ज्या महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण होईल, त्यांची नावे योजनेतून आपोआप वगळली जाणार आहेत. मात्र, ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे पात्र असूनही लाखो तरुणी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना ठरावीक कालावधीपुरतीच असल्याची चर्चा सुरू आहे.
अपात्र महिलांकडून वसुली नाही, पण...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार सोलापूर जिल्ह्यातीलही अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. मात्र, पुरुष लाभार्थ्यांकडून मिळालेल्या रकमेची वसुली केली जाणार आहे. ज्या महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण होईल, त्यांची नावे योजनेतून आपोआप कमी होणार आहेत. नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाही.
- अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी
सुरुवातीचे एकूण लाभार्थी
११,३०,५६३
दरमहा मिळणारा निधी
१६९.५९ कोटी रुपये
पडताळणीनंतर अपात्र महिला
अंदाजे ५.२२ लाख
अपात्र महिलांना मिळालेली रक्कम
१,५६६ कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.