Loksabha 2019 : मोदींनी देश कुठे नेऊन ठेवलाय बघा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना अपघाताने सत्ता मिळाली. साडेचार वर्षांत त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय, हे आपल्यासमोरच आहे. गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा करू नका, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

सोलापूर - गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना अपघाताने सत्ता मिळाली. साडेचार वर्षांत त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय, हे आपल्यासमोरच आहे. गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा करू नका, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजिलेल्या सभेत पवार बोलत होते.  

ज्या राज्यात भाजप सत्तेत नाही, त्या राज्यात पंतप्रधान प्रचारासाठी गेल्यावर तेथील मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. नेहरू-गांधी घराण्यावर टीका करणारे मोदी आता पवार घराण्यावरही टीका करू लागले आहेत. मोदींनी आमच्या कुटुंबाबद्दल आत्मीयता दाखविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे; परंतु कुटुंब नसलेला व्यक्ती आमच्या कुटुंबावर टीका करत आहे. माझ्या कुटुंबाची तुम्ही चिंता करू नका. कुटुंबातील ऐक्‍य हे कुटुंबासाठी महत्त्वाचे असते. ज्यांना कुटुंबच नाही, त्यांनी हे सांगायची गरज नाही. त्यामुळे या टीकेकडे आम्ही फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला. 

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अपघाताने संधी मिळाली आहे. त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी. त्यांच्या हातात सत्तेचे आणखी सात-आठ महिने आहेत. त्यानंतर समजेल कोण कोणाची चौकशी करतेय. महसूलमंत्री पाटील म्हणजे विनोद आहेत. त्यांच्या विधानांना फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता नाही.’’ व्यासपीठावर शिंदे, आमदार भारत भालके, रामहरी रूपनवर उपस्थित होते.

...म्हणून राज ठाकरे सोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशावर आलेले राजकीय संकट असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली. मोदी-शहा यांना सत्तेवरून घालविण्यासाठी ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. हे संकट घालविण्यासाठी ते आमच्यासोबत आहेत. लोकसभा लढविण्यासाठी त्यांच्या पक्षाने जागांची मागणी केली नसल्याचेही पवार यांनी सांगितले.

लोकसभा 2019

Web Title: last parliamentary elections Narendra Modi got power in an accident says sharad pawar