लातूरच्या विजया कापसे यांची मद्रासच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती

संभाजी रा. देशमुख
रविवार, 12 ऑगस्ट 2018

न्या. विजया कापसे ताहिलरमानी यांचे वडिलही हैदराबादमुक्ती लढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसेनांनीपैकी एक होते. त्यांनीही काही काळ न्यायाधीशपदी कार्य करून उच्च न्यायालयात वकिली होती. तर या स्वतः विजया कापसे यांनी दहा वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. त्यानंतर सात वर्षे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत राहिल्या.

लातूर : नळगीर (ता. उदगीर) येथील न्या. विजया कापसे ताहिलरामानी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली आहे. त्यांनी रविवारी (ता.12) तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून पदाची शपथ घेतली. तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. लातूरचे दोघे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

गेल्या वर्षी डिंसेबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. विजया कापसे ताहिलरमानी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. विजया ताहिलरमानी यांची शिफारस मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी केली होती. तर मूळचे मुशिराबाद (ता. लातूर) येथील न्या. नरेश पाटील हे ऑक्टोबर 2001 पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी कार्यरत आहेत.

न्या. विजया ताहिलरमानी यांच्या बढतीनंतर राष्ट्रपतींनी वरिष्ठ न्यायमूर्ती पाटील यांची मुंबई उच्च न्यायालायाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली आहे. रविवारी (ता. 12) तमिळनाडूचे राज्यपाल पुरोहित यांनी न्या. विजया कमलेश ताहिलरमानी यांना मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ दिली. यावेळी मद्रास उच्च न्यायालयाचे 11 न्यायमूर्ती, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम् उपस्थित होते.

न्या. विजया ताहिलरमानी या मद्रास उच्च न्यायालयाच्या तिसऱया महिला मुख्य न्यायमूर्ती आहेत. न्या. इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात बढती झाल्यामुळे रिक्तपदी न्या. विजया ताहिलरमानी यांची नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱया लातूर जिल्ह्यातील न्या. विजया ताहिलरमानी या पहिल्याच महिला ठरल्या.

न्या. विजया कापसे ताहिलरमानी यांचे वडिलही हैदराबादमुक्ती लढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसेनांनीपैकी एक होते. त्यांनीही काही काळ न्यायाधीशपदी कार्य करून उच्च न्यायालयात वकिली होती. तर या स्वतः विजया कापसे यांनी दहा वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. त्यानंतर सात वर्षे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत राहिल्या.

2016 मध्ये प्रथम त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायामूर्तीपदी कार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची नियुक्ती मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.

भारतातील दोन वेगवेगळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी एकाच जिल्ह्यातील दोघांची निवड होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. या शपथविधीला महाराष्ट्रातील 22 न्यायाधीश उपस्थित होते. लातूर येथील अॅड. धनंजय पाटील, अॅड. पद्माकर उगिले आणि अॅड. धीरज पाटील उपस्थित होते. 

Web Title: Laturs Vijaya Kapse is the Chief Justice of Madras and Naresh Patil is the Chief Justice of Mumbai