अभयारण्यातील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी चला सोलापूर जिल्ह्यातील नान्नजला 

अभयारण्यातील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी चला सोलापूर जिल्ह्यातील नान्नजला 

सोलापूर ः सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. त्याचे हिरव्या शालूतील रुप पाहण्यासाठी पर्यटकांची पावले साहजिकच सोलापूरपासून जवळ असलेल्या नान्नज येथील अभयारण्याकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून जरी हे परिचीत असले तरी मागील काही वर्षांपासून त्याठिकाणी माळढोकचे वास्तव्य दिसले नाही. पण, काळवीट, हरीण, लांडगा, नाचणारा मोर, ससा, घोरपड, खोकड, चित्तर, चंडोल, घुबड यासारखे प्राणी-पक्षी पाहण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांना नान्नज (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी असलेल्या अभयारण्यात घेता येऊ शकतो. 

यंदाच्या हंगामात पावसाची सुरवात अतिशय चांगली झाली आहे. त्यामुळे धरतीने हिरवागार शालू नेसला आहे. शहराच्या बाहेर पडल्यानंतर धरतीचे हे मनमोहक रुप आपल्याला पाहायला मिळते. सोलापूर-बार्शी राज्य महामार्गावर सोलापूरपासून 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावर नान्नज हे गाव आहे. त्याठिकाणी माळढोक पक्षी अभयारण्य आहे. पूर्वी या अभयारण्यात 30 ते 35 माळढोकपक्षी पाहायला मिळत होते. मात्र, अलीकडे माळढोकचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता या अभयारण्याच्या परिसरात एक माळढोक पक्षी कधीतरी पाहायला मिळतो. नान्ज, मार्डी, अकोलेकाटी, नरोटेवाडी, कारंबा या गावाच्या उजाड माळरानावर हे अभयारण्य पसरले आहे. या अभयारण्यात वेगवेगळ्या पक्षांचा वावर पाहायला मिळतो. या अभयारण्यामध्ये सध्या हिरवेगार गवत सगळ्यांचे मन वेधून घेत आहे. त्याठिकाणी असलेली वेगवेगळ्या झाडांची फुले आकर्षक दिसत आहेत. नान्नज-मार्डी रस्त्यावर या अभयारण्याचे कार्यालय आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी विश्रामगृहही आहे. त्या विश्रामगृहामध्ये एकावेळी जवळपास 10 ते 15 जणांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. याठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या जेवणाचीही सोय केली जाते. त्यासाठी ठरलेले पैसे पर्यटकांना मोजावे लागतात. 

अभयारण्यात आलेल्या पर्यटकांना सकाळी सहा ते आठ व सायंकाळी पाच ते अंधार पडेपर्यंत अभयारण्यात पक्षी, प्राणी पाहण्याची सोय केली आहे. वन्यजीव विभागाच्यावतीने लपणगृह, टॉवर, निरीक्षण कुटीची निर्मिती याठिकाणी केली आहे. त्याच्या सहायाने पक्षी निरीक्षणाचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. अभयारण्यात असलेल्या प्राणी व पक्षांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वन्यजीव विभागाच्यावतीने पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. या पाणवठ्याच्या माध्यमातून प्राणी, पक्षी आपली तहान भागवतात. अभयारण्यात 11 ठिकाणी हे पाणवठे निर्माण केले आहेत. अभयारण्यात लांडग्यांचा वावारही मोठ्या प्रमाणात आहे. अनेकवेळा शेजारील शेतकऱ्यांना त्यांचा काहीप्रमाणात त्रासही सहन करावा लागतो. त्याचबरोबर काळवीट व हरीणांची संख्याही मोठी आहे. अभयारण्यात हिरवेगार गवत असल्यामुळे काळवीट व हरणांसाठी उपयुक्त असलेले खाद्या त्याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. लांडग्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. लांडगीणीच्या वेतासाठी "डेन' तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी येऊन ती आपल्या पिलाला जन्म देऊ शकते. तसी व्यवस्था "डेन'च्या माध्यमातून वन्यजीव विभागाने केली आहे. 

नान्नज अभयारण्यात कसे जाल... 
सोलापूर-बार्शी रोडवर नान्नज हे गाव 
सोलापूरपासून 22 किलोमीटर अंतरावर 
पर्यटकांच्या निवासासाठी विश्रामगृहाची सोय 
मराठवाड्यातून येणाऱ्यांसाठी सोलापूर-तुळजापूर रोडवर तामलवाडी येथून मार्डी मार्गे अभयारण्यात येण्याची सोय. 
मराठवाड्यातून येणाऱ्या पर्यटकांकडे स्वतःची वाहन व्यवस्था असावी. 

कोरोनामुळे अभयारण्य बंद 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सध्या अभयारण्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ज्यावेळी लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल होईल व सरकारचे नव्याने आदेश येतील त्यावेळीच पर्यटकांना अभयारण्यात येता येईल. माळढोक जरी आता दिसला नसला तरी इतर प्राणी, पक्षी अभयारण्यात पाहता येतील. अभयारण्यातील हिरवे गवत मनमोहक आहे. 
कल्याणराव साबळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, नान्नज. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com