पराभूतांना मंत्रीपदे नकोत; कॉंग्रेसकडून सोनिया गांधी यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

मंत्रिमंडळाचा विस्तार होताना विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना मंत्रीपदे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनावणे यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.

मुंबई - मंत्रिमंडळाचा विस्तार होताना विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना मंत्रीपदे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनावणे यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना पक्षातूनही पराभूतांना मंत्रीपदे नको, अशी मागणी आधीपासून जोर धरत होती. आता शिवसेनेच्या पाठोपाठ कॉंग्रेसमध्येही अशी मागणी होऊ लागली आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना होत आला आहे. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या दोन - दोन मंत्र्यांचा शपथविधीही उरकला. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. कॉंग्रेस पक्षाकडून कोण मंत्री होणार हे दिल्ली दरबारी ठरणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याने समजते. 

भाजप मंत्री म्हणतात, राहुल-प्रियांका तर लाईव्ह पेट्रोल बॉम्ब

अशातच कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनावणे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे वरील मागणी केली आहे. कॉंग्रेसकडे अनेक मातब्बर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकात पराभूत झालेल्या उमेदवारांकडून मंत्री मंडळात वर्णी लागावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. हा प्रकार दुर्दैवी असून, या प्रकारामुळे कॉंग्रेसमधील फार मोठा गट नाराज असल्याचे सोनावणे यांनी सांगितले. अशा लोकांना मंत्रीपदे दिल्यास पक्षाची प्रतिमा खराब होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 

राज्यात कॉंग्रेस पक्षाकडे अनुभवी आणि ज्ञानी लोकांचा भरणा मोठा आहे. पक्षाने अशा अनुभवी लोकांना दूर ठेवले होते. त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली तर याचा फायदा कॉंग्रेस पक्षालाच होणार आहे. अशा लोकांमुळेच कॉंग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोचेल आणि पक्षाची ताकद वाढेल, असेही सोनावणे यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter from Congress to Sonia Gandhi for do not post to ministers defeat