

State Election Commission
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी नव्या बदलानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी २७१ तर पंचायत समित्यांसाठी ४८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला पेनातील शाई लावली, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाटलीतील शाई वापरली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येकी सहा गट आहेत. तसेच माढा व सांगोल्यात प्रत्येकी सात, पंढरपुरात आठ, उत्तर सोलापुरात तीन, मंगळवेढ्यात चार गट आहेत. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक नऊ गट आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने पेनमधील शाई वापरली. त्यावेळी बोटाला लावलेली शाई लगेच पुसते आणि दुबार मतदान होऊ शकते, असा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी पेनऐवजी बाटलीतील शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी साडेआठ हजार बाटल्या लागणार आहेत. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे कळविली आहे.
ठळक...
जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २७१ उमेदवार; यात ११८ महिला आणि १५३ पुरुष आहेत.
११ पंचायत समित्यांमधील १३६ जागांसाठी ४८५ उमेदवार; यात २५२ पुरुष आणि २३३ महिला आहेत.
झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आहेत.
तालुकानिहाय जागा अन् उमेदवार
तालुका पं. समिती झेडपी
करमाळा ४६ २०
माढा ५० २०
बार्शी ३६ १६
उ.सोलापूर २२ १४
मोहोळ ४१ २५
पंढरपूर ७० ४६
माळशिरस ५४ ३०
सांगोला ५४ ४१
मंगळवेढा २५ १३
द.सोलापूर ५२ २८
अक्कलकोट ३५ १८
एकूण ४८५ २७१
झेडपीसाठीही लाडक्या बहिणीच निर्णायक
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ लाख ८२ हजार ८३ महिला मतदार आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामध्ये सोलापूर ग्रामीणमधील नऊ लाख महिला लाभार्थी आहेत. याच लाडक्या बहिणींचे मतदान जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निर्णायक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.