नोटा बदलण्याची मर्यादा दोन हजारांवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलणे आणि नव्या नोटांसाठी जनतेचा संघर्ष सुरू असताना सरकारकडून दर दिवशी नवे नियम लागू केले जात आहेत. आज सरकातर्फे जाहीर झालेल्या निर्णयानुसार उद्यापासून साडेचार हजारांऐवजी केवळ दोन हजार रुपयांपर्यंतच नोटा बदलता येतील. मात्र, विवाहकार्यासाठी बॅंक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येतील, तर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डमार्फत 25 हजार रुपये काढता येतील. 

नोटाटंचाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बदललेल्या नियमांची माहिती दिली. यानुसार उद्यापासून बॅंक आणि टपाल कार्यालयांमध्ये केवळ दोन हजार रुपयांपर्यंतच नोटा बदलता येऊ शकतील. सुरवातीला चार हजार रुपयांपर्यंत असलेली ही मर्यादा नंतर साडेचार हजार रुपये अशी करण्यात आली होती. 

नोटांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत खरेदी करण्यात अडचण येत असून पेरण्याही खोळंबल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा उल्लेख करून शक्तिकांत दास म्हणाले, शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजनेचा हप्ता भरण्याची मुदतदेखील 15 दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे आठवड्याला 25 हजार रुपये काढता येऊ शकतील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नोंदणीकृत व्यापाऱ्यांना आठवड्याला 50 हजार रुपये काढण्यास परवानगी दिली आहे. 
 
विवाहकार्य असलेल्या खातेधारकांना अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. अर्थात, त्यासाठी वर किंवा वधूच्या आई-वडिलांपैकी एकाला बॅंकेत जाऊन लग्नपत्रिका देखील दाखवावी लागणार आहे. ही रक्कम एकाच खात्यातून काढणे आणि त्यासाठी केवायसी देणे खातेधारकांना बंधनकारक असेल. परंतु, पॅनकार्ड जोडलेल्या खात्यातूनच ही वाढीव रक्कम काढली जाऊ शकते, असेही दास यांनी सांगितले. 
 
महत्त्वाचे निर्णय 
उद्यापासून 4500 ऐवजी केवळ 2000 रुपयांपर्यंतच नोटा बदलता येणार 
विवाहकार्यासाठी बॅंक खात्यातून अडीच लाख रुपये काढण्याची सवलत 
किसान क्रेडिट कार्डमार्फत 25 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार 
ग्रुप-सी श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना वेतनातून 10 हजार रुपयांपर्यंतची उचल 
पीकविमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ 

Web Title: limits on the replacement of two thousand