मराठवाड्यावर खैरात

प्रशांत कांबळे
बुधवार, 26 जून 2019

अपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव कर्जापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

अपंग महामंडळाचे नागपूर विभागात सर्वांत कमी कर्जवाटप
मुंबई - अपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव कर्जापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

अपंग शेतकरीही कर्जाच्या प्रतीक्षेतच असून, कर्ज न मिळताच त्यांना कर्जाचा बोजा सहन करावा लागतो आहे, असे ‘सकाळ’ने दाखवून दिले. ‘सकाळ’ने अपंग महामंडळाचा कर्ज वाटपाचा भोंगळ कारभार उघड केल्यानंतर आता महामंडळ शेतकऱ्यांच्या सात बारावरून बोजा कमी करण्याच्या कामाला लागले आहे.  

सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या अपंग व वित्त विकास महामंडळातील कर्ज वाटपासाठी मराठवाडा विभागावर खास नजर असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागात तब्बल ३३ कोटी ८३ लाख १२ हजार ४३ रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. या तुलनेत नागपूर विभागात मात्र फक्त पावणेआठ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. राज्यात वर्ष २०१८ पर्यंत हजारो लाभार्थींनी महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केले असतानाही कर्जाचे वाटप न करता, मर्जीतील कर्जदारांनाच महामंडळाचा आशीर्वाद लाभल्याचे चित्र आहे. 

केंद्रीय महांडळाकडून राज्य अपंग महामंडळाला १३५ कोटी रुपयांचा निधी कर्जवाटपासाठी दिला होता. त्यापैकी फक्त १० हजार ५४९ लाभार्थींना ११३ कोटींचे कर्जवाटप केले. मात्र, कर्ज मंजूर होऊनही कर्जाचा लाभ न घेणाऱ्या लाभार्थींचे २२ कोटी महामंडळाकडे शिल्लक होते. तरीही त्या रकमेतून अन्य लाभार्थींना कर्जाचा लाभ न देताच महामंडळाने केंद्रिय अपंग महामंडळाला शिल्लक २२ कोटी रुपये परत पाठवण्याचा कारभार केला आहे. त्यामुळे हजारो अपंग शेतकरी अद्यापही कर्जापासून वंचित असून, कर्जाच्या प्रतीक्षेत अपंग महामंडळाच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan Distribution by Disability Corporation