esakal | लॉकडाउन निर्बंध राज्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर

बोलून बातमी शोधा

Lockdown
लॉकडाउन निर्बंध शेतकऱ्यांच्या मुळावर
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पुणे - कोरोनाने सर्वत्र उडालेला हाहाकार आणि शेतीमाल बाजार व्यवस्थेवरील परिणाम विचारात न घेता लॉकडाउनचे निर्बंध कडक केल्याने राज्यातील भाजीपाला, फळे, अन्नधान्याची पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. या गोंधळाचा फायदा घेत दलाल-व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे दर पाडल्याने प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांची रोज कोट्यवधी रुपयांची हानी होते आहे. मातीमोल भावाने शेतीमाल विकण्यापेक्षा शेतकरी काही ठिकाणी उभ्या पिकांमध्ये जनावरे घालत असल्याचे विदारक चित्र काही जिल्ह्यांमध्ये आहे.

लॉकडाउनचे निर्बंध कठोर करताना शेतीमालाची वाहतूक, मागणी-पुरवठा तसेच खरेदी-विक्री या साखळीवर होणारे परिणाम सरकारी यंत्रणेने तपासले नाहीत. त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री विस्कळीत झाली आहे. काही बाजार समित्यांमध्ये आवक दुपटीने वाढली; तर काही समित्यांमध्ये शेतीमाल कमी असूनही खरेदीसाठी व्यापारी नाहीत. त्यामुळे आवक असतानाही आणि नसतानाही बाजारभाव मात्र ५० ते ७० टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

मराठवाड्यात देखील शेतीमाल व्यापाराची घडी विस्कळीत झाली आहे. परभणी जिल्ह्यातील कडक निर्बंधामुळे दोन आठवड्यांपासून भाजीपाला मार्केट बंद पडले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनावर जगणाऱ्या शेकडो गावांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. कोरोना साथीमुळे काही तालुक्यांमध्ये दोन-दोन महिन्यांपासून आठवडे बाजारदेखील बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर माल विक्रीचे मोठे संकट उभे आहे. हरभरा, गहू, ज्वारी, हळद असा शेतीमाल विकून खरिपासाठी तयारी करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन होते.

पश्‍चिम महाराष्ट्रात सोलापूरसह पंढरपूर, अकलूज, बार्शी या प्रमुख बाजार समित्यांमध्ये लॉकडॉउनची नियमावली सांभाळून व्यवहार सुरू आहेत. पण फळे -भाजीपाल्यांचे दर मात्र पडलेले आहेत. दुसऱ्या बाजूला काही शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात पडला आहे. तर काही भागांमध्ये बाजार पडल्याने कोथिंबीर, वांगी, टोमॅटो, भेंडी, दोडका तसाच ठेवला आहे. हा माल शेतातच सडून जात असून काही शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेवत हा भाजीपाला आपल्या जनावरांना घालत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागातून दररोज शंभर ते दोनशे ट्रक शेतीमाल मुंबई, पुण्याच्या बाजारपेठात जातो. मात्र भावाची शाश्‍वती नसल्याने साठ टक्क्यांपर्यंत पुरवठा घटल्याचे भाजीपाला संघातून सांगण्यात आले. राज्याच्या भाजीपाला पिकाचे माहेरघर असलेल्या नाशिक भागात देखील लॉकडाउनमुळे संपूर्ण बाजारव्यवस्था विस्कळीत झाली आहे. सध्या ढोबळी मिरची, कारले, काकडी, वांगे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी ही पिके काढणीला आहेत. मात्र मागणी नसल्याने शेतातून काढणी करण्याच्याही मन:स्थितीत शेतकरी नाहीत.

हेही वाचा: देहविक्री करणाऱ्या महिलांचे अनुदान कष्टकरी महिलांच्या खात्यावर; चौकशीची मागणी

असे होतेय नुकसान

  • शेतीमालाची पुरवठा साखळी विस्कळीत

  • शेकडो गावांचे अर्थकारण कोलमडले

  • फळे-भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान

  • संधी साधून पाडले जातात बाजारभाव

  • बाजारभाव ५० ते ७० टक्क्यांपर्यंत पाडले

  • बाजार समित्यांतच सडतोय भाजीपाला

  • खरिपाच्या तयारीसाठी हाती नाही पैसा

विदर्भात भाव पाडले

विदर्भात अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, वाशीम, गोंदिया, बुलडाणा, नागपूर या दहा जिल्ह्यांत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. मात्र कडक लॉकडाउन व शेतीमाल वाहतूक संथ असल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. उन्हातान्हात राबून कष्टाने बाजारात माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे.