1 जुलैपासून लॉकडाऊन उठणार नाही, पण...वाचा मुख्यमंत्र्यांनी काय केल्या सुचना

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 28 June 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधलं आहे. यावेळी त्यांनी अनलॉक-2 आणि लॉकडाऊन संदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधलं आहे. यावेळी त्यांनी अनलॉक-2 आणि लॉकडाऊन संदर्भातली माहिती दिली आहे. येत्या 1 जुलैपासून लॉकडाऊन उठणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच याव्यतिरिक्त त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचं देखील कौतुक केलं आहे.

मुंबईतील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी संवादाच्या सुरुवातीला त्यांनी लॉकडाऊनच्या काळात तसंच चक्रीवादळामुळे आर्थिक नुकसान खूप झालं आहे. कोरोनाशी लढता लढता निसर्ग चक्रीवादळाचा संकट आलं असं ते म्हणाले. रायगडमध्ये चक्रीवादळानं थैमानं घातलं. यामुळे चक्रीवादळामुळेही खूप नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

वादळाच्या तडाख्यात शासन यंत्रणेनं चांगलं काम केलं असल्याचं सांगत निसर्ग चक्रीवादळाची भीषणता होती. वादळात प्राणहानी कमी ठेवण्यातही यश आल्याचं त्यांनी सांगितलं.

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

1 जुलैनंतरही लॉकडाऊन कायम 

कोरोनाच संटक अद्याप टळलेलं नाही आहे. येत्या 1 जुलैपासून लॉकडाऊन उठणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.  आपण सध्या कोरोनाच्या कात्रीत सापडलो आहोत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असंही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सांगितलं आहे.

हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाहेर पडलात, तर प्रत्येक पावलावर धोका आहे. एखादी गोष्ट उघडली म्हणजे सगळं आलबेल हा भ्रम आहे. बुधवारपासून काही अत्यावश्यक गोष्टी सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

डॉक्टरांना सलाम 

1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांना माझा सलाम, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 1 तारखेला शेतकरी दिनही असल्यानं शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सलाम केला आहे. कोरोना असतानाही शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला त्यांनी सलाम केला.

अफाट कष्ट करुन पेरलेलं उगवलं नाही, तर काय करणार? असं म्हणत बोगस बियाण्यांबाबतच्या अनेक तक्रारी येणं हे दुर्देव असल्याचं त्यांनी म्हटलं. कायद्याच्या कात्रीत अडकलेली कर्जमुक्ती लवकरच राबवणार असून आचारसंहिता, कोरोनामुळे थांबलेला निधी लवकरच देऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिलं. तसंच ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं. त्यांना आम्ही शिक्षा देणारच असंही ते म्हणालेत.

मुख्यमंत्री आषाढीच्या वारीला जाणार

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सर्व धर्मियांचे मला आभार मानत मी आषाढीच्या वारीला जाणार असल्याचं सांगितलं. 2010 साली आकाशातून पाहिलेल्या वारीत मला विठ्ठलांचं विश्वरुप दिसलं. वारकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन मी विठ्ठलाचा आशीर्वाद घेणार आणि आपल्या वतीनं मी विठ्ठलाला साकडं घालणार असं ते म्हणाले. तुमचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी वारीला जाणारेय. कोरोनाच्या या परिस्थितीतून जगाला बाहेर काढ  असं साकडं देखील घालणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितलं.

कोणतीही चर्चा न करता दहीहंडीचा सोहळा रद्द करण्यात आला. दहीहंडी मंडळांनी सामाजिक भान ठेऊन दहीहंडी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचं त्यांनी म्हटलं. सर्व गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.  गणेशोत्सवातही बाप्पाच्या मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य असल्याचंही ते म्हणालेत. इतंकच काय तर मुख्यमंत्र्यांनी विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका ही विनंतही केली आहे. कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवावर मर्यादा घालणं ही एक चळवळच आहे. त्यामुळे आपण चळवळीचा वारसा घेऊन पुढे जायचंय असं ते म्हणाले. 

प्लाज्मादान करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

रक्तदानासोबतच प्लाज्मादान करणं आता गरजेचं असल्याचं त्यांनी जनतेला सांगितलं. प्लाज्मा थेरपीनं 90 टक्के रुग्ण बरे होत असून प्लाज्मा थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्र राज्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाज्मादान करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

चेस द व्हायरस संकल्पना 

चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु झाली असून ही संकल्पना राज्यातही राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

अर्थचक्राला गती दिल्यानंतर रुग्णांची संख्या वाढणारचं असं म्हणत राज्यात आरोग्य सुविधांची संख्या वाढवत आहोत. पीपीई किट, एन 95 मास्कचा मुबलक पुरवठा होत असून असं त्यांनी म्हटलं. म्हणून ज्येष्ठ डॉक्टरांनी खबरदारी घेऊन काम सुरु करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ डॉक्टरांकडे केली आहे. 

पावसाळ्यात रोगराई वाढणार हे उघड आहे. डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो अशा रोगांपासून दूर राहा. पावसाळ्यात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. घरात पामी साचणार नाही याचीही पूर्ण काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं. तसंच खासगी रुग्णालये डॉक्टरांनी बंद ठेऊ नयेत ही विनंतीही केली. 

भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी हा चिंतेचा विषय असून मास्क न वापरणं हे जास्त धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही जिल्ह्यांमधून मला लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही गर्दी कराल, तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराचा त्यांनी यावेळी दिला. 

संकटामध्येही सुद्धा महाराष्ट्र उद्योजकांना आपला वाटतो. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी मिशन बिगीन अगेन केलं. राज्यातल्या जनतेला रोजगार मिळायला हवा. पर्यटन, उद्योगातून नक्की रोजगार निर्मिती होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 16 हजार कोटींचे करार केले अशी माहिती देत उद्योजकांनो, महाराष्ट्रात या गुंतवणूक करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केलं आहे. 

शाळा कशी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसं सुरु होणार हे पाहू त्यावर जास्त लक्ष देऊ असंही त्यांनी म्हटलं आहे. 1 तारखेपासून जिथे गरज आहे, तिथे जास्त काळजी घ्या. 1 तारखेपासून लॉकडाऊन उठला असं समजू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lockdown will not be relaxed from the 1st, but ... read what the Chief Minister is saying