अधिवेशनाच्या तोंडावर भाजप अडचणीत? महेतांवर लोकायुक्तांचे ताशेरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विकासकाला झुकते माप दिल्याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्‍तांनी त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या संदर्भात विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महेता यांनी संबंधित वृत्त फेटाळले आहे. 

मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विकासकाला झुकते माप दिल्याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्‍तांनी त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या संदर्भात विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महेता यांनी संबंधित वृत्त फेटाळले आहे. 

एसआरए प्रकरणात महेता यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राज्याचे लोकयुक्त एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात प्रकाश महेतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती आहे. तसेच लोकायुक्तांचा हा अहवाल आणि त्यावर राज्य सरकारने केलेली कारवाई हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्‍यता आहे. एमपी मिल कंपाउंडच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र या निर्णय प्रक्रियेत आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन विकासकाच्या फायद्यासाठी मंत्रीमहोदयांनी निर्णय घेतल्याचे मतही लोकयुक्तांनी व्यक्त केले आहे.

"मुख्यंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाईलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला," अशी कबुली प्रकाश महेता यांनी लोकायुक्तांकडे दिली आहे. ताडदेवमधील एमपी मिल कंपाऊंडसह मुंबईतील अन्य एसआरए प्रकल्पांना प्रकाश महेता यांनी दिलेली मंजुरी वादग्रस्त ठरली आहे. यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लोकायुक्‍तांकडे सोपविले होते. 

काय आहे प्रकरण? 
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड इथल्या एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर आहे. एसडी कॉर्पोरेशन या विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्त चौकशीची परवानगी दिल्यानंतर म्हाडा, एसआरए आणि गृहनिर्माण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांपुढे हजेरी लावली होती. 

लोकायुक्‍तांचा अहवाल आल्याची कल्पना नाही. अहवाल आला असेल आणि त्यात माझ्या विरोधात काही लिहिलेले असेल आणि ते खरं असेल तरच यावर मी भाष्य करु शकेन. मात्र हे वृत्त कुठून आले तेच आपणांस माहिती नाही.- प्रकाश महेता, गृहनिर्माणमंत्री 

मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच महेतांना क्‍लीन चिट दिली होती. मात्र चौकशीमुळे आता सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली होती. आता सत्य समोर आल्याने मुख्यमंत्रयांनी महेता यांच्यावर कारवाई करावी.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

एमपी मील एसआरए योजनेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी गंभीर सवाल उपस्थित केल्याची माहिती प्रसार माध्यमात आली आहे. सरकारने याप्रकरणी भूमिका स्पष्ट करून महेता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.- सचिन सावंत, प्रवक्‍ता, प्रदेश कॉंग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokayukta Blames On Prakash Mehata Regarding Mp Mill Compound Scam Msr 87