Loksabha 2019 : निवडणुकीच्या पतंगबाजीत विमानांची सद्दी

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 2 एप्रिल 2019

गरिबांसाठी, आम आदमीसाठी लढणाऱ्या राजकीय नेत्यांना उपखंडासम पसरलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात पक्षविचार पोचवायचे असल्याने सध्या विमानांचे भाव भलतेच वधारले आहेत. राजकीय नेत्यांची विमाने उंच उडत असून कोटीच्या कोटी उड्डाणे हा टप्पा केव्हाच गाठला गेला आहे. हेलिकॉप्टरच्या वापरासाठी तासागणिक किमान १ लाख रुपयांचा दर आकारला जात असून विशेष विमानांसाठी हाच दर तब्बल चार लाखांपर्यंत पोचतो आहे.

मुंबई - गरिबांसाठी, आम आदमीसाठी लढणाऱ्या राजकीय नेत्यांना उपखंडासम पसरलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात पक्षविचार पोचवायचे असल्याने सध्या विमानांचे भाव भलतेच वधारले आहेत. राजकीय नेत्यांची विमाने उंच उडत असून कोटीच्या कोटी उड्डाणे हा टप्पा केव्हाच गाठला गेला आहे. हेलिकॉप्टरच्या वापरासाठी तासागणिक किमान १ लाख रुपयांचा दर आकारला जात असून विशेष विमानांसाठी हाच दर तब्बल चार लाखांपर्यंत पोचतो आहे. 

निवडणुकांचे महाराष्ट्रातले चार टप्पे लक्षात घेता राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हेलिकॉप्टर किंवा विशेष विमाने बुक केली आहेत. राष्ट्रीय पक्षांनी विमानांचे आगाऊ आरक्षण केले असल्याने गरीब बिचाऱ्या प्रादेशिक पक्षांना मात्र देता का कुणी विमाने अशी विचारणा करावी लागते आहे. भारतात साधारणत: २५० हेलिकॉप्टर्स वापरली जातात. त्यातील १०० विमाने राजकीय मंडळी वापरतात. बडी ८ ते ९ नेते मंडळी चार्टर्ड फ्लाईट वापरतात.

या विशेष विमानांची आकारणीही जवळपास याच आकडेवारीत मोडणारी आहे. महाराष्ट्राच्या आकाशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विशेष विमाने वापरतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ही हेलिकॉप्टर्स वापरणारी मंडळी आहेत. सामान्यत: काही उद्योजकांची हवाई वाहनेही बडे नेते वापरतात. त्यावर निवडणुकीच्या काळात व्यावसायिक दर लावा अशी मागणी पुढे येत असते. अशा विमानांचा खर्च पक्षाच्या हिशेबात येत नसल्याने ही विमाने वापरणे सोयीचे होते. विशेष विमानातून हवाई प्रवास ही भारतात आता चैन राहिली नसून निवडणूक नसताना सामन्यत: ७० ते ८० हजार प्रतितास भाड्याने विमाने उपलब्ध असतात.

सुरक्षेच्या मुद्याकडे लक्ष
निवडणुकीच्या काळात मागणी वाढल्याने दर वाढतात. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विमानांना वारंवार झालेले अपघात लक्षात घेता हवाई सुरक्षा हा सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने काही कडक नियम केले आहेत. विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या मंदार भारदे यांनी विमानांचा दर्जा तसेच व्यवस्थापन याकडे काटेकोर लक्ष पुरवले जात असल्याचे सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 Politics Leader Plane