Narendra Modi : विरोधक जनतेला मूर्ख बनवताहेत; मोदी यांची टीका

नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे राजू पारवे यांच्या प्रचारार्थ कन्हान येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली.
Narendra Modi
Narendra Modisakal

कन्हान (जि. नागपूर) - ‘इंडिया आघाडीतील नेते नागरिकांना राज्यघटनेच्या नावावर मूर्ख बनवित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना काँग्रेसने सत्तर वर्षांत संपूर्ण भारतात कधीच लागू केली नाही. घटनेतील ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटनेच्या तरतुदी पूर्णपणे लागू होत नव्हत्या.

तेथील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना इतर भारतात मिळणाऱ्या अधिकार आणि सवलतींपासून वंचित राहावे लागले होते. पण, नागरिकांमध्ये भेदभाव करणारे ३७० कलम आम्ही हटविले आणि ‘एक देश, एक राज्यघटना’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण केले,’ असे उद्‍गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे राजू पारवे यांच्या प्रचारार्थ कन्हान येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. पंतप्रधान व्यासपीठावर येताच उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा दिल्या. त्यांनी मराठीतून भाषणाला प्रारंभ केला. केंद्रातील एनडीए सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी भाषणात सादर केला.

‘‘ही निवडणूक म्हणजे भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या विकास आणि संपन्नतेची पायाभरणी आहे. मोदींमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा धोशा ‘इंडिया’ आघाडीचे नेते लावत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हेच सुरू आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून विरोधक लोकशाही धोक्यात ही एकच घोषणा देत आहेत. पण, देशात आणीबाणी लागू केली तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती काय?’ असा प्रश्न मोदींनी केला. विरोधकांकडे नवा मुद्दाही नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

‘इंडिया आघाडी जनतेमध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहे. कारण जनता एकजूट झाली तर आपली डाळ शिजणार नाही हे त्यांना माहीत आहे. पण, जर इंडिया आघाडीला बळ मिळाले, तर देशाचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही,’ असेही ते म्हणाले.

‘गेल्या ५०० वर्षांपासूनचा राममंदिराचा मुद्दा निकाली निघाला आहे. यावर्षी जनतेला रामलल्लाचे दर्शन तंबूत जाऊन नव्हे तर भव्य मंदिरात जाऊन घ्यायचे आहे. जनतेला राममंदिर उभारल्याने आनंद झाला आहे, पण काँग्रेसने राममंदिर उद्‍घाटनाचे निमंत्रण नाकारून सनातन धर्मालाच नाकारले,’ अशी टीका मोदींनी केली. ‘मोदी रामटेकला आले होते हे गावागावात जाऊन सांगा आणि सगळ्यांना माझा राम राम कळवा,’’ असे म्हणत मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

मला शिव्या म्हणजे विजय पक्का!

पंतप्रधानांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले की, निवडणूक आली की मला शिवीगाळ करण्याचे काम काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीतील नेते करीत असतात. गेल्या कित्येक निवडणुकांपासून हेच सुरू आहे. जेव्हा जेव्हा विरोधक मला शिव्या देत असतील, ‘ईव्हीएम’ विरोधात प्रश्न उपस्थित करीत असतील तेव्हा समजून जायचे की पुन्हा ‘एनडीए’चे सरकार येणार आहे. आपल्यावर कितीही शाब्दीक हल्ले झालेत तरीही देशाची, जनतेची सेवा करण्यापासून मागे हटणार नाही, असे पंतप्रधानांनी ठासून सांगितले.

एससी, एसटींना मागास ठेवले

‘काँग्रेसने गेल्या ६० वर्षांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना त्यांचे हक्क आणि सवलतींपासून दूर ठेवले. मात्र, ‘एनडीए’ सरकारने आदिवासींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. ‘एनडीए’च्या काळातच एक आदिवासी महिला राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्या. ओबीसी समाजासाठीही सरकारने प्रयत्न केले असून ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला,’ असे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले...

- काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही

- गोसेखुर्द प्रकल्प काँग्रेसने अनेक दशके अपूर्ण ठेवला. महायुतीने कामाला वेग दिला

- तेलबियांच्या संदर्भात देशाला स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू

- रामायण सर्किट, बुद्ध सर्किटचे काम जोरात सुरू

- समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग

- गेल्या दहा वर्षांतील विकास हे ॲपेटायझर आहे, थाळी अजून बाकी आहे

- माझा प्रत्येक क्षण देशासाठी, जनतेसाठी

भाषणाची सुरुवात

- भाषणाची सुरुवात मराठीत

- प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व राजे रघुजी भोसले यांच्या शौर्याचा वारसा लाभलेले रामटेक, असा उल्लेख करत नमन

- गोंड राजे बख्त बुलंद शाह, बाबा जुमदेव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन

कोण काय म्हणाले?

एकनाथ शिंदे : ‘अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ’ अशी विरोधकांची अवस्था

नितीन गडकरी : नागपूर मेट्रो कन्हान शहरापर्यंत धावणार, जिल्ह्यातील एक लाख युवकांना रोजगार देणार

रामदास आठवले : काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला तुम्ही करा नष्ट

देवेंद्र फडणवीस : ‘नो बर्वे, ओन्ली पारवे’ हा रामटेकसाठी नारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com