Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ‘मोदी प्रचार डे’ ठरला. नाशिकमधील सभेत पंतप्रधानांनी असली आणि नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला धारेवर धरले.
Narendra Modi
Narendra Modisakal

नाशिक- मुंबई - राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ‘मोदी प्रचार डे’ ठरला. नाशिकमधील सभेत पंतप्रधानांनी असली आणि नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला धारेवर धरले तर ‘कल्याण’मधील सभेत त्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. धर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाची वाटणी करण्याचा काँग्रेसचा इरादा होता. मुस्लिमांना ते पंधरा टक्क्यांचा वाटा देऊ पाहत होते असा आरोपही त्यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानावरूनही त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडत आहे. ठाणे, पालघर, कल्याणसह महामुंबईतील तब्बल १० मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल. त्या पार्श्वभूमीवर आज सर्व पक्षांच्या प्रचाराचा जोर पाहायला मिळाला. पंतप्रधान मोदींनी नाशिक आणि मुंबईच्या ‘कल्याण’मध्ये सभा घेतल्यानंतर घाटकोपरमध्ये रोड शोही केला.

या रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही नाशिकमध्ये सभा झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वणी येथे सभा घेतली. नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘भाजपला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून त्यांना सगळी नकली संताने म्हणजे आपल्याकडचे गद्दारही मांडीवर घ्यावे लागले.

एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री त्यांनी घेतला. मुख्यमंत्री कितीचा असेल? आणखी एक नकली संतान त्यांनी मांडीवर घेतले. ते तर फारच वाह्यात निघाले त्याचे नाव प्रफुल्ल पटेल. पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यावर माझ्या महाराजांचा जिरेटोप ठेऊ नका. मोदींची माझ्या महाराजांसोबत बरोबरी करायची पात्रता आहे काय?’ असा सवाल ठाकरेंनी केला.

नकली शिवसेना राहणार नाही

नाशिक - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात,’ या ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षा’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे.

हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वांत जास्त आठवण स्व. बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणायचे की मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेल. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.काँग्रेस मतपेढीचे राजकारण करत असून धर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाचे वाटप करण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप मोदींनी केला.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज मोदींची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे यांसह आमदार उपस्थित होते.

त्याची त्यांना चीड येते

मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला. नकली शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला. काँग्रेसचे लोक मंदिरावरून चुकीचे बोलत आहेत. नकली शिवसेना यावर गप्प आहे. ही पापाची भागीदारी आहे.’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिवसरात्र काँग्रेस शिव्या घालत असताना देखील नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहेत. राज्यातील जनता या लोकांना शिक्षा देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धर्मावर आधारित बजेट करतील

मोदी म्हणाले, ‘देशातील सरकारे जेवढे बजेट तयार करते त्यातील १५ टक्के खर्च फक्त अल्पसंख्याकांवर केला जातो. धर्माच्या आधारे बजेटचे वाटप करण्यात आले. धर्माच्या आधारे त्यांनी देशाचे तुकडे केले. आताही ते धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप करत आहे. धर्माच्या आधारे बजेटच्या वितरणाला मंजुरी दिली होती. बजेटचे असे तुकडे करणे भयंकर आहे. काँग्रेससाठी अल्पसंख्याक फक्त एकच आहे. त्यांची ती प्रिय व्होटबँक आहे.

मी मुख्यमंत्री असताना जेव्हा काँग्रेसने ही गोष्ट पुढे आणली होती तेव्हा मी त्याला विरोध केला होता. काँग्रेसला तेव्हा देशातील सर्व बजेटमधील १५ टक्के वाटा फक्त मुसलमानांवर खर्च व्हावा असे वाटत होते. मात्र, भाजपच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही.’’

‘फूट पाडण्याचा काँग्रेसचा डाव’

ठाणे/ डोंबिवली : हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान काँग्रेसचे असून देशात ‘व्होट जिहाद’चा प्रयत्न होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्याण येथील सभेत केला. काँग्रेसवर हल्लाबोल करताना त्यांनी इंडिया आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही सडकून टीका केली. ‘नकली शिवसेने’चा पुन्नरुच्चार करत, हिंमत असेल तर काँग्रेसच्या शहजाद्यांना वीर सावरकरांचा मोठेपणा सांगणारी पाच वाक्य बोलायला लावा, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिले.

महायुतीचे कल्याण व भिवंडी लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांवर टीका केली. सभेत पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करत काँग्रसचे मुस्लिम धोरण आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर थेट टीका केली.

मोदी म्हणाले, ‘काँग्रेस फुटीरतावादी, दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे. नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे. काँग्रेसच्या शहजाद्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला हे तुम्ही पाहिले आहे. पण नकली शिवसेनेने तोंडाला कुलूप लावले. काँग्रेसचे शहजादे महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांचा अपमान करतात. त्यांना खडसावण्याची नकली शिवसेनेत हिंमत नाही.’

बेवारस बाँब ठेवणारे बनले बेवारस

मोदी म्हणाले, ‘१० वर्षांपूर्वी देशातील सार्वजनिक ठिकाणे असुरक्षित होती. कोणत्याही बेवारस सामानाला हात लावू नका, बाँब असण्याची शक्यता आहे, असे आवाहन केले जायचे. आता ही सूचना बंद झाली आहे कारण बेवारस बाँब ठेवणारे हात बेवारस झाले आहेत.’

ब्लू प्रिंट तयार

निवडून आल्यावर पहिल्या १०० दिवसांमध्ये काय करायचे याची ब्लू प्रिंट तयार असल्याचे मोदींनी सांगितले. ‘या व्हिजनमध्ये आता २५ दिवस आणखी वाढवणार असून त्यामध्ये तरुणांच्या कल्पकतेला प्राधान्य देणार,’ असे मोदी यावेळी म्हणाले. देशाच्या विकासासाठी काय करता येऊ शकते, याच्या नावीन्यपूर्ण कल्पना पाठवण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले.

‘...हे त्यांच्याकडून वदवून घ्या’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून मोदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, ‘काँग्रेसवाले सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. नकली शिवसेनावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. नकली शिवसेनेमध्ये काँग्रेसला असे करण्यापासून रोखण्याची हिंमत नाही.

महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या लोकांना मी आव्हान देतो की, त्यांनी काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून वीर सावरकरांबद्दल पाच चांगली वाक्ये वदवून घ्यावीत.’ काँग्रेसच्या युवराजांची वीर सावरकरांवरील टीका पाहून आम्ही त्याला विरोध केला आणि नकली शिवसेनेवरही टीका केली. तो युवराज त्यानंतर सावरकरांबद्दल काहीही बोललेला नाही, असेही मोदींनी निदर्शनास आणून दिले.

‘काँग्रेसला शिक्षा करा’

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले,‘‘काँग्रेसचे सरकार असताना देशात दहशतवादी याकूब मेमनची कबर बांधली जाते. तेच काँग्रेसवाले श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारतात आणि राम मंदिराबाबत सातत्याने अपमानजनक भाषा वापरतात. जनतेला काँग्रेसचे हे वागणे मान्य आहे का? तुम्ही त्यांना मत देणार का? तुम्ही इंडिया आघाडीला या निवडणुकीत शिक्षा देणार की नाही? त्यांना अशी शिक्षा करा की पुन्हा ते असे पाप करणार नाहीत.’’

कांद्यासाठी घोषणा

नाशिकमधील सभेत कांद्याचा प्रश्‍न गाजला. ‘मोदीजी कांद्यावर बोला, कांद्यावर..!’ भरगच्च सभेत एका शेतकऱ्याने अशी घोषणा दिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा गोंधळ शांत करण्यासाठी मोदी यांनी ‘जय श्रीराम’चा असा नारा दिला. यानंतर सभेत घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर मोदींनीही मागील दहा वर्षांत कांदा अन्‌ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची यादी वाचली.

अजित पवार अनुपस्थित

मोदी यांच्या महाराष्ट्रातील तीन पैकी एकाही कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोदींच्या शेजारी बसले. कल्याण येथे झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मुंबईतील भव्य ‘रोड शो’ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते पण तब्येत बरी नसल्याने अजित पवार आले नाहीत असे सांगितले जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com