मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी निश्चित झाली असून, कॉंग्रेसच्या पाच मतदारसंघावर "राष्ट्रवादी'ने दावा केला आहे. या वेळी "राष्ट्रवादी'ला कॉंग्रेसकडील किमान तीन अतिरिक्त लोकसभा मतदारसंघ हवे आहेत. त्याबाबतचा प्रस्तावच शुक्रवारी कॉंग्रेसला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
'राष्ट्रवादी'ने दावा केलेल्या मतदारसंघात विजयाची खात्री असलेले उमेदवार असल्याचेही कॉंग्रेसला कळवण्यात आले आहे. मात्र, या मागणीवर कॉंग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम भूमिका जाहीर केली जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना कळवले आहे. "राष्ट्रवादी'ने 2014 मध्ये 21 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, आता पक्षाने 24 लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यांना हव्या असलेल्या मतदारसंघांमध्ये औरंगाबाद, हातकणंगले, जालना, यवतमाळ व पुणे या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हे पाचही मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहेत.
जालन्यातून माजी मंत्री राजेश टोपे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. हातकणंगलेमध्ये निवेदिता माने, औरंगाबादमधून फौजिया खान, यवतमाळमधून मनोहर नाईक अथवा त्यांचे चिरंजीव यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा मानस आहे. सध्या "राष्ट्रवादी'चे पाच खासदार आहेत, तर कॉंग्रेसचे दोन खासदार आहेत.
2014च्या सूत्रानुसारच जागावाटप करण्याचे धोरण ठरल्यास काही मतदारसंघाची अदलाबदल करताना या पाच मतदारसंघाचाही विचार व्हावा, असा प्रस्ताव "राष्ट्रवादी'ने दिला आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने तोडगा निघू शकतो, अशी भूमिका आज दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे.
पवार - गांधी भेट
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्या वेळी आगामी निवडणूक जागावाटपाची चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक घेतली. त्यानंतर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यात जागावाटप व प्रस्तावित मतदारसंघाच्या अदलाबदलीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
2014 मधील जागावाटप
27 - कॉंग्रेस
21 - राष्ट्रवादी कॉंग्रेस
24 - आगामी निवडणुकीसाठी "राष्ट्रवादी'ची मागणी
|