सीताफळाला मोठा दणका

पुणे - पावसामुळे काढणीच्या अवस्थेत असणारी सीताफळे झाडावरच फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे - पावसामुळे काढणीच्या अवस्थेत असणारी सीताफळे झाडावरच फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाने फळे उकलली,  काढणीच्या फळांचे ५० टक्क्यांवर नुकसान
पुणे - ऑक्टोबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे ३ लाख एकरांवरील सीताफळ बागांना फटका बसला आहे. ५० टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज असून, सुमारे २५० कोटींच्या घरात शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यात पुण्यासह, औरंगाबाद, बुलडाणा, सोलापूर, सातारा, भंडारा, नगर आदी विविध जिल्‍ह्यांमध्ये सीताफळाचे उत्पादन घेतले जात आहे. या भागात सुमारे तीन लाख एकरांवर लागवड आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात आणि प्रामुख्याने पुरंदर तालुका सीताफळ उत्पादनात अग्रेसर आहे.  

जिल्ह्यातील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र बाधित झाले असून, काढणीला आलेली सुमारे ७० टक्के सीताफळाचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यात सीताफळाचे सुमारे १० हजार एकरवर लागवड आहे. तर इतर तालुक्यांमध्ये सुमारे १५ हजार एकर क्षेत्रावर असे सुमारे २५ हजार एकर क्षेत्रावर लागवड आहे. मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाच्या बागेत पाणी साठणे, जमिनीतील आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे फळे १५ ते २० दिवस अगोदरच अकाली उकलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज सीताफळ तज्ज्ञ डॉ. विकास खैरे यांनी व्यक्त केला आहे. 

खैरे म्हणाले, ‘‘मी नुकताच धालेवाडी, जेजुरी परिसरातील सीताफळ बागांची पाहणी केली. या दरम्यान फळांची अकाली झालेली उकल, काळ्या बुरशीमुळे फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. यामुळे बाजारभाव देखील पडले आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान सीताफळाला २० किलोच्या क्रेटला २ ते अडीच हजार रुपये दर होता. हाच दर आता ७०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. या दराचा विचार केला, तर शेतकऱ्यांचे सुमारे ७० ते ८० कोटींचे नुकसान झाल्याची भीती आहे.’’ 

रघुनाथ चौधरी (रा. खरपुडी, ता. खेड) म्हणाले, ‘‘माझी शेताच्या बांधावर पारंपरिक सुमारे १ हजार झाडे असून, मध्ये पाऊस उघडल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे सीताफळ पिकायला लागली होती. त्यातच दोन दिवसांत झालेल्या पावसाने फळे फुटली असून, हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे दरवर्षी मिळणारे दीड-दोन लाखांचे उत्पन्न अजून ३० हजार पण झालेले नाही.

‘अवकाळी पावसाने सीताफळ झाडावरच पिकण्याचे प्रमाण वाढले. तर काढणी न होऊ शकल्याने फळे जमिनीवर पडू लागली. तसेच बाजारपेठेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने दरदेखील ५० टक्क्यांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्यात सुमारे २०० ते २५० कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- श्याम गट्टाणी, महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघ

देशात सीताफळ उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर 
अपेडाच्या २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण २ लाख ९७ हजार ९४ टनांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा ३०.९८ टक्के म्हणजेच ९२ हजार ३२० टन एवढा आहे. त्या खालोखाल गुजरात (२०.५३ टक्के), मध्य प्रदेश (१०.०४ टक्के), छत्तीसगड (१३.२८) तेलंगणा (५.३४ टक्के) वाटा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com