आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; राज, फडणवीसांच्या टीकेला ‘मविआ’चे प्रत्युत्तर

एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना दुसरीकडे राजकीय पक्षांनी रविवारी जाहीर सभांतून परस्परांवर टीकास्त्र सोडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले
maha vikas aghadi response to Raj Thackeray devendra Fadnavis criticism mumbai
maha vikas aghadi response to Raj Thackeray devendra Fadnavis criticism mumbai esakal

मुंबई : एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना दुसरीकडे राजकीय पक्षांनी रविवारी जाहीर सभांतून परस्परांवर टीकास्त्र सोडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आज दिवसभरही याच आरोप- प्रत्यारोपांचे पडसाद उमटत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतून भोंगे उतरविण्यासाठी चार तारखेची मुदत देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. राज यांच्या आरोपांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आज प्रत्युत्तर दिले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना कोठे होती? कारसेवकांमध्ये मी होतो’ असा दावा केला. या दोन्ही मुद्द्यांचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी केलेल्या विधानावरून नवाच वाद निर्माण झाला आहे. अभ्यासकांकडून या संदर्भात आज वेगवेगळे पुरावे सादर करत राज यांना प्रत्युत्तर देण्यात आले.फडणवीस यांच्या रविवारच्या सभेतील भाषणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, ‘‘बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? असे कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावे. त्या काळात सीबीआयाने केलेल्या तपासाची पाने आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कोठे आहे? असे विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कोठे होती? आणि काय करत होती हे कळेल.’’ मूळ प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी भाजप आणि त्यांचे छुपे साथीदार याकडे लोकांना आकर्षित करत आहेत. किती काळ तुम्ही बाबरीच्या विषयावर बोलणार आहात? देशातील महागाई, बेरोजगारी चीनने केलेली घुसखोरी यावरून लक्ष हटविण्यासाठी हनुमान चालिसा आणि बाबरीच्या मुद्द्यावर भाजप आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष बोलत आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मनसेवरही निशाणा साधला आहे.

राज यांच्यावर कारवाईची मागणी

राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे वाजविण्यास चिथावणी देऊन धार्मिक तेढ निर्माण केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या ॲड. प्रीती मेनन शर्मा यांनी केली. समाजात तेढ पसरविण्यास कारणीभूत ठरेल असे वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.

शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे. तिथे संजय राऊत यांनी जाऊन यावे. तुमचा जन्मच १९६० नंतरचा आहे आणि हे आंदोलन त्याआधी सुरू झाले. जन्म होण्याआधी मी कारसेवेला गेलो होतो असे म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे.

- आशिष शेलार, भाजपचे नेते

शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकीही राज ठाकरे यांची लायकी नाही. पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी दिली आहे, मग विरोध करणारे हे आहेत तरी कोण?

- अबू आझमी, नेते समाजवादी पक्ष

राज ठाकरे हे खोटा इतिहास सांगून राज्यात जातीय तेढ पसरवीत असल्याने त्यांना अटक करण्यात यावी

- प्रवीण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

राज यांनी सुपारीबाजाप्रमाणे भाषण केले. त्यांचे औरंगाबादेतील रविवारचे भाषण त्याच पद्धतीचे होते. जनतेच्या प्रश्नावर बोलतील ही अपेक्षा त्यांनी फोल ठरवली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे. राज ठाकरेंच्या ४ तारखेच्या इशाऱ्याला म्हणूनच काही अर्थ नाही. राज्याची करमणूक मात्र होत आहे.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

ईदमुळे महाआरती रद्द

मुंबई : अक्षयतृतीयेला महाआरत्या करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागे घेतला आहे. रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा सण आनंदात साजरा व्हावा, कोणाच्याही सणात बाधा येऊ नये, यासाठी आरत्या न करण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विवटरवरून जाहीर केला आहे. तसेच, भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याने त्याबाबत पुढे काय करायचे हे उद्या (ता. ३) ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करणार असल्याचे राज ठाकरे सांगितले आहे.

लोकांच्या मनामध्ये जे विष कालवत आहेत त्यांनी एखादी संस्था, एखादा कारखाना उभा केला आहे का? संसार उभा करण्यासाठी अक्कल लागते. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही. त्यांचे जेवढे वय आहे तेवढे शरद पवारांचे काम आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची पोलिस आयुक्त तपासणी करतील. नियम मोडले असल्यास किंवा आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाईबाबत पोलिस महासंचालक योग्य तो निर्णय घेतील.

- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com